
कराड ः प्रेमीयुगुलाला पळून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून जनार्दन महादेव गुरव यांना जबर मारहाण केली होती या मारहाणीत गुरव यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी काल पाच जणांना अटक केली होती. बुधवारी या प्रकरणात आणखी तीन संशयित पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रेमी युगुल पळून गेल्यानंतर यातील युवतीच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांनी युवकाच्या कुटूंबाला बेदम मारहाण केली. तसेच पळून जाण्यासाठी मदत केल्याच्या संशयातून जनार्दन गुरव यांना लाकडी दांडक्याने मारहाण करुन खून करण्यात आला. सुर्ली, ता. कराड येथे घाटात सोमवारी रात्री ही घटना घडली.
याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात दहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेखर ऊर्फ उदय भिमराव पवार, बाबासाहेब भिमराव पवार, गौरव बाबासाहेब पवार (तिघेही रा. हजारमाची, ता. कराड) यासह आणखी दोघांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली आहे. त्यानंतर बुधवारी पोलिसांनी तीन संशयितास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे कसून चौकशी सुरू असून या प्रकरणात त्यांचा सहभाग समोर आल्यास त्यांना अटक केली जाईल असेही पोलिसांनी यावेळी सांगितले.