
कराड : लुटमार करताना गळ्यावर चाकूने वार करुन प्रवाशाचा खून केल्याप्रकरणी टेम्पो चालकाला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. डी. बी. पतंगे यांनी बुधवारी ही शिक्षा ठोठावली. संदीप शिवशंकराप्पा बुडगी (वय ३१, रा. बावीकिरे, ता. निलमंगला, जि. बेळगाव, सध्या रा. मुद्दापुरा, जि. चित्रदुर्ग, राज्य कर्नाटक) असे शिक्षा ठोठावलेल्या चालकाचे नाव आहे.
सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव येथील सोनार्ली वसाहतीमध्ये राहणारा स्वप्निल गणेश सुतार (वय २२) हा युवक फेब्रुवारी २०१९ मध्ये कामानिमित्त पुण्यात वास्तव्याला होता. बहिणीच्या लग्नासाठी गावी पेठवडगावला त्याला जायचे होते. त्यावेळी त्याला वाहनात बसविण्यासाठी मित्र करण बाबर हा नवले ब्रिज येथे आला. पुण्याहून कोल्हापूरकडे जाणाºया एका टेम्पोमध्ये रात्रीच्यावेळी स्वप्निल बसला. त्यानंतर करण तेथून निघून गेला. दरम्यान, चालक संदीप बुडगी याने कराड तालुक्यातील तासवडे टोलनाक्यापासून दहा ते पंधरा किलोमीटरवर आल्यानंतर टेम्पो उपमार्गावर थांबवला. तसेच स्वप्निलकडे पैशाची आणि किमती ऐवजाची मागणी केली. स्वप्निलने नकार दिल्यानंतर चालक बुडगी याने चिडून जाऊन चिकटपट्टीने स्वप्नीलचे हात बांधले. तसेच स्वत:कडे असलेल्या चाकूने त्याच्यावर वार केले. त्याला टेम्पोतून खाली उतरवून रस्त्यानजीक असलेल्या उसात ओढत नेले. त्याठिकाणी मारहाण करीत असताना स्वप्निलने आरडाओरडा केला. त्यामुळे चिडून जाऊन बुडगी याने त्याच्या गळ्यावर वार करून त्याचा खून केला. तसेच मृतदेह शेतातच टाकून बॅग आणि इतर किमती ऐवज घेऊन तो टेम्पोतून पसार झाला.
दरम्यान, ११ फेब्रुवारी २०१९ रोजी शेतात स्वप्निलचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता गुन्ह्याची उकल झाली. तत्कालीन पोलीस निरीक्षक अशोक क्षिरसागर यांनी या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अटक करीत त्याच्याविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी काम पाहिले. सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद, सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षिदारांच्या साक्ष ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपी संदीप बुडगी याला दोषी धरून जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाला सहाय्यक पोलीस फौजदार ए. के. मदने, हवालदार दिलीप क्षीरसागर, महिला पोलीस कॉन्स्टेबल अर्चना पाटील, हवालदार सुर्यकांत खिलारे यांनी सहकार्य केले.
सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आर. डी. परमाज यांनी या खटल्यात एकूण अठरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये मृत स्वप्निल सुतार याचा मित्र करण बाबर याची साक्षर महत्वपूर्ण ठरली. तसेच कराडच्या उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. एल. कुराडे, डॉ. एस. जे. सावंत, तपासी अधिकारी अशोक क्षिरसागर यांच्याही साक्ष खटल्यात महत्त्वाच्या ठरल्या.