आमदार सतेज पाटील यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता : बाळासाहेब थोरात

कोल्हापूर : रोज वेगवेगळ्या लोकांची नावे घेऊन हे लोक भाजपमध्ये येणार असल्याचे सांगून गोंधळ निर्माण करण्याची भाजपची नीती असल्याचा आरोप काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. दरम्यान, आमदार सतेज पाटील यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे, त्यांना महाराष्ट्र सांभाळायचा आहे, असे सांगत थोरात यांनी आमदार पाटील यांचे कौतुक केले.
दोन दिवस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या थोरात यांनी ‘उत्तर’च्या काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘काँग्रेसमधून कुणीही गेले तरी लोकमानस पक्षासोबत आहे. भाजपकडून चारशे पार, पंचेचाळीस प्लस असे नारे दिले जात आहेत. सध्या काही सर्व्हेमधून महाविकास आघाडीला राज्यात लोकसभेच्या २८ जागा मिळतील, असे सांगितले जाते. पण यापेक्षा सुद्धा चांगले यश मिळून सर्वजण चकित होतील इतक्या जागा मिळतील,’ असा विश्वासही थोरात यांनी व्यक्त केला.
मराठा आरक्षणाला आघाडीचा पाठिंबा आहे, परंतु विशेष अधिवेशनादरम्यान आघाडीने उपस्थित केलेल्या मुद्यांवर सरकारकडून समाधानाकारक खुलासा झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रात आणि राज्यातही शेतकरी हिताचे निर्णय घेतले जात नसल्याचा आरोप त्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना केला. यावेळी आमदार सतेज पाटील, जयश्री जाधव, सत्यजित जाधव यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.