राज्यसातारा

वाकुर्डे नळपाणीपुरवठा योजना सोलर फिडरवर आणण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडणार 

शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत आ. डॉ. अतुलबाबा भोसले यांची घोषणा

कराड : वाकुर्डे नळ पाणीपुरवठा योजनेवरील वीज खर्चाचा भार कमी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी, ही योजना सोलर फिडरवर आणण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडणार असल्याची घोषणा आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केली. कृष्णा हॉस्पिटल येथील जनसंपर्क कार्यालयात त्यांच्या नेतृत्वाखाली योजनेशी संबंधित गावांतील शेतकरी व अधिकाऱ्यांची व्यापक बैठक झाली. यावेळी ते बोलत होते.
कराड दक्षिणमधील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे इत्यादी गावातील ग्रामस्थांना वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. पण दरवर्षी उन्हाळ्याची चाहूल सुरु होताच, या भागात पाण्याची समस्या गंभीर बनते. पाणी टंचाईमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी यंदा उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच, सुरवातीपासूनच नियमित व वेळेत पाणी पुरवठा व्हावा, याबाबत योग्य धोरण निश्चित करण्यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी कृष्णा हॉस्पिटल येथील जनसंपर्क कार्यालयात योजनेशी संबंधित गावांतील शेतकरी व अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
या बैठकीत विविध गावांतील शेतकऱ्यांनी भविष्यात उन्हाळ्यात निर्माण होणारे पाणी टंचाईचे संकट लक्षात घेऊन, वाकुर्डे योजनेचे पाणी नियमित व किमान तीन आवर्तनांमध्ये मिळावे, तसेच वीजबिल माफ करण्याबाबत शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.
यावेळी बोलताना आ.डॉ. भोसले म्हणाले की, गेल्या काही वर्षात सातत्याने कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून वाकुर्डे योजनेचे वीजबिल भरले जात असल्याने दरवर्षी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. तसेच राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणात्मक निर्णयामुळे या योजनेतील ८० टक्के वीज खर्च शासनाकडून आणि २० टक्के खर्च शेतकऱ्यांकडून भरण्याची व्यवस्था करण्यात आली असून, या निर्णयाचा लाभ वाकुर्डे योजनेतील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणावर झाला आहे. पण येत्या काळात हा २० टक्क्यांचा भारदेखील कमी व्हावा, यासाठी ही योजना सोलर फिडरवर आणण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडणार आहे. तसेच या विषयावर संबंधित इतर विधानसभा सदस्यांशी चर्चा करून लवकरच संयुक्त बैठक आयोजित करण्याचाही प्रयत्न केला जाईल.
दरम्यान, लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत वेळेत पाणी पोहोचावे, यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सूचना आ.डॉ. भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. बैठकीला वारणा-कोथरूडचे उपविभागीय अधिकारी विजय आंबोळे, शाखा अभियंता ऋतुराज कुराडे, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, पंकज पाटील, संजय शेवाळे, प्रविण साळुंखे, हंबीरराव पाटील, जयवंतराव पाटील, व्ही. टी. थोरात, अण्णासाहेब जाधव, संदीप भावके, दीपक थोरात, किरण पाटील, आबासो शेंडगे, श्रीकांत पाटील, संताजी शेवाळे, शुभम कारंडे, बाजीराव पाटील यांच्यासह विविध गावांमधील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिराळा उपसा जलसिंचन योजना प्रस्तावित 
शासनस्तरावर सुमारे ७०० कोटी रुपयांची शिराळा उपसा जलसिंचन योजना प्रस्तावित असून, तिच्या माध्यमातून परिसरातील सुमारे ७५०० एकर शेतीला पाणी उपलब्ध होणार आहे. यामध्ये आपल्या भागातीलही काही गावांचा समावेश आहे. या योजनेचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे काम सुरु असून, भविष्यात या भागातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांनी व्यक्त केली.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close