मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण हे शोधले पाहिजे : देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठा समाजाने जे मोर्चे काढले ते शांततेनेच काढले होते. पण यावेळी बीडमध्ये काय घडलं? आपण राजकारण कुठल्या स्तराला चाललं आहे? आज आपण समाजाला विघटित करण्याचा आणि समाजाचे तुकडे पाडून राजकारण सुरू आहे. कुणासोबत फोटो दिसतायेत, कोण पैसा पुरवतंय, ही प्रत्येक गोष्ट आता बाहेर येते, कुठेही लपत नाही. कुणी कुणाची आई-बहीण काढणार असेल मग विरोधी पक्ष असो वा सत्ताधारी सभागृहाने आढेवेढे न घेता भूमिका घ्यायला हवी. कुणाबद्दलही हे घडलं तरी देवेंद्र फडणवीस ताकदीने उभा राहील. मला मनोज जरांगे पाटील यांच्याशी देणेघेणं नाही. परंतु त्यांच्यामागील बोलविता धनी कोण हे शोधले पाहिजे. कुणी वॉर रूम उघडल्या, नवी मुंबईत कुणी उघडली सगळी माहिती समोर आलीय. त्याची SIT चौकशी होईल. सगळी चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढले जाईल असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केले.
विधानसभेत आशिष शेलार यांनी जरांगेंच्या विधानाचा निषेध करत त्यांच्या चौकशीचा मुद्दा मांडला. त्यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या विषयावर माझी बोलण्याची इच्छा नव्हती. पण सभागृहात हा विषय आला म्हणून बोलावे लागतंय. मराठा समाजाला मी आरक्षण दिले, ते आरक्षण हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो तोवर सुप्रीम कोर्टातही टिकवले. एवढेच नाही तर सारथीसारखी संस्था सुरू करणे, विद्यार्थ्यांना फी सवलत देणे, वसतीगृह मिळत नाही तोवर विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याचा विषय असेल. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कर्ज देणे असेल. वेगवेगळ्या प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना असेल या माझ्या काळात सुरू झाल्या. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या कारकिर्दीत या योजना अधिक मजबूत आणि सुदृढ केल्या. त्यामुळे मराठा समाजाच्या बाबतीत मला कुणाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. जे काही केलंय, ते मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील जे काही बोलले त्यानंतर मराठा समाज माझ्या पाठिशी उभा आहे. त्यांच्या पाठिशी उभा राहिला नाही असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत अशाप्रकारे कुणी कुणाची आई बहिण काढेल. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सांगतो, कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेला परत पाठवणारे छत्रपती त्यांचे नाव घेत लोकांच्या आई बहिणी काढायचं? माझी त्यांच्याबद्दल तक्रार नाही. मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण हे शोधावेच लागेल. जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो शेलारांनी नंतर मांडला. दगडफेक करायला कुणी सांगितली? पोलिसांनी लाठीचार्ज का केला? आता हे षडयंत्र बाहेर येतंय. मनोज जरांगे पाटील यांना रात्री घरातून बाहेर आणणारे कोण आहेत, त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणासोबत बैठक झाली? पोलिसांवर दगडफेक करायला कुणी सांगितली तर आता यातील आरोपी सांगतायेत. पोलीस आपले नाहीत का, आपल्या पोलिसांना मारायचे? असा सवालही फडणवीसांनी विचारला आहे.