
कराड ः जुन्या कोयना पुलालगत दैत्य निवारणी मंदिराजवळ नदीपात्रात 35 वर्षे वयोगटातील पुरुष जातीचा मृतदेह मिळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवून या खून प्रकरणी कराड शहर पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत दोन मारेकऱ्यांना जेरबंद केले आहे. संबंधित मृतदेह हा कर्नाटक मधील सेंट्रींग व्यावसायिकाचा असून आर्थिक देवाण-घेवाणीच्या कारणातून त्याला सिमेंट पाईपने मारहाण करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना पोलीस तपासात समोर आली आहे या यशस्वी तपासाची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी कराड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अरूण देवकर, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील उपस्थित होते.
याबाबतची माहिती देताना पोलीस अधीक्षक समीर शेख म्हणाले, दि.23 फेब्रुवारी रोजी कराड येथील कोयना नदी पात्रात पाच फूट आठ इंच उंचीचा पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला होता. सिमेंटच्या पाईपला काळी दोरी बांधून मृतदेह नदी पात्रात बुडवण्यात आला होता. कराड पोलिसांनी या मृतदेहाची स्केचद्वारे ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तपासासाठी पोलीस पथके कराड, मुंबई, पुणे, चिपळूण तसेच कर्नाटक राज्यात पाठवण्यात आली. अवघ्या चार दिवसात कराड शहर पोलिसांनी काही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असता त्यामध्ये मृतदेहाच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. पोलिसांनी कसून तपास करत शकील अन्वर शेख (वय 20 रा. दैत्यनिवारण मंदिर, कराड) कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय 24 रा. मुजावर कॉलनी कराड) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला.
पैशाच्या कारणावरूनच संबंधित सेंटरिंग व्यावसायिकाचा खून करण्यात आल्याची कबुली त्यांनी दिली. या प्रकरणांमध्ये त्यांनी आणखी एका इसमाची मदत घेतली असून त्याचा शोध सुरू आहे. संबंधित आरोपींना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संबंधित आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार नसून रागाच्या भरात व्यावसायिक कारणावरून त्यांनी सेंट्रींग व्यवसायिकाचा खून केल्याचे कबूल केले आहे असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
सदरची कामगिरी कराडचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजय चोरगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंद जाधव, सोनाली पिसाळ, सुनील माळी, स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फार्णे, अमित पाटील व शरद बेबले साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, निलेश फडतरे, मयूर देशमुख, अविनाश चव्हाण, मोहन पवार, शिवाजी गुरव, मोहसीन मोमीन, पृथ्वीराज जाधव, अरुण पाटील, विशाल पवार, गणेश कापरे यांनी तपासात भाग घेतला होता