
कराड : ओगलेवाडी, ता. कराड येथील वीज कंपनीच्या कार्यालयात चोरी करणाऱ्या दोन जणांना कराड शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन अटक केली. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा सुमारे सहा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
अजय चन्ने (वय 26) व रणजीत सुर्यवंशी (26) दोघेही रा. हजारमाची, ता. कराड अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, ओगलेवाडी येथील वीज कंपनीच्या कार्यालयात 24 फेब्रुवारी रोजी चोरी झाली होती. यामध्ये चोरट्यांनी स्टोअर रुम फोडून त्यातील अल्यूमिनीअम कंडक्टर 500 मीटर व अन्य साहित्य असे सहा लाख दहा हजार रुपयांचे साहित्य चोरुन नेले होते. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याच्या तपासाचे आदेश वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांनी दिले होते.
त्यानुसार गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक पतंग पाटील व सहाय्यक फौजदार विवेक गोवारकर, रघुवीर देसाई, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, संग्राम पाटील, सोनाली पिसाळ यांच्या पथकाने या गुन्हयाचा तपास सुरु केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज सीसीटीव्ही फुटेज नसल्याने तपासाचे आव्हान होते. उपनिरीक्षक पाटील यांनी या गुन्ह्याबाबत सूत्रांकडून माहिती मिळवली. त्यावेळी ओगलेवाडी परीसरातील तीन जणांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची सर्व माहिती घेवून पोलीस पथकाने सापळा रचला. त्यानंतर अजय चन्ने व रणजीत सुर्यवंशी यांना अटक करून त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यांनी गुन्हा कबूल करत सहा लाख दहा हजारांचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली. या कारवाईत पोलिसांनी चोरट्यांकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.