
कराड : मलकापूर नगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांसाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांमधून 9 कोटी 59 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
मलकापूर शहराचा झपाट्याने होणारा विकास व नगरपालिका अंतर्गत पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत प्राथमिक सोयी-सुविधांमुळे शहरात नागरिकांच्या वास्तव्यामध्ये वाढ होत आहे. त्यात पालिका हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील कोल्हापूर नाका, मलकापूर ते नांदलापूर दरम्यान नवीन उड्डाणपुल बांधण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे मलकापूर हद्दीतून कराड शहरात जाणारी व शहरातून बाहेर पडणारी वाहने मलकापूर मधून ये-जा करत आहेत. या कामास अंदाजे 1 ते 2 वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्याअनुषंगाने आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने खालील विकास कामे मंजूर झाली आहेत.
यामध्ये नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजनेंतर्गत मलकापूर फाटा ते लक्ष्मीनगर रस्ता रुंदीकरण, फुटपाथ व सुशोभिकरण करण्यासाठी 1 कोटी 49 लाख, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेंतर्गत 2 कोटी 1 लाख, सहायक संचालक, नगर विकास योजनेंतर्गत विश्रामनगर येथील रस्ता 71 लाख, राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 ते वृंदावन सिटी रस्ता 1 कोटी 90 लाख, नवीन प्रशासकीय इमारतीसाठी वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत 1 कोटी, विशेष रस्ता अनुदान अंतर्गत 30 लाख, आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत 29 लाख, लक्ष्मीनगर येथील स्मशानभूमी/दफनभूमी विस्तारीकरण, सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी विशेष सहाय्य योजनेंतर्गत 1 कोटी 89 लाख केंद्र व राज्य शासनाच्या वतीने एकूण 9 कोटी 59 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. काही कामांची निविदा प्रक्रिया पुर्ण झाल्या असून काही कामांची निविदा प्रक्रिया सुरु आहे.
सदर निधी मंजूरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ना. हरदीप सिंह पुरी, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री ना. शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा नियोजन अधिकारी सातारा, नगररचना संचालक अविनाश पाटील, सहायक संचालक श्री. काळे, सातारा नगरपालिका प्रशासन अधिकारी, पल्लवी पाटील यांच्यासह मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा नीलम येडगे, मुख्याधिकारी प्रताप कोळी, तसेच माजी बांधकाम समिती सभापती राजेंद्र यादव आणि नगरसेवक, नगरसेविका, पालिका अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले आहे. या सर्व विकासकामांमुळे शहरातील दळण-वळणाची सुविधा सुलभ होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.