
कराड ः कालेटेक ता. कराड गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे पाठीमागील दरवाजाचा कोयंडा कशाने तरी काढून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत तुकाराम रंगराव साठे (वय 55 रा. कालेटेक, ता. कराड) यांनी ग्रामीण पोलिसात दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी तुकाराम साठे हे शनिवारी अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचे शेजारी यांनी त्यांना फोन करून सांगितले की तुमचे राहते घराचा पाठीमागील दरवाजाचे कोयंडा तोडलेला दिसत आहे. त्यानंतर साठे यांनी घरी येऊन पाहिले असता घराचे पाठीमागील दरवाजाचा कोयंडा तोडलेला दिसला. साठे यांनी घरात जाऊन पाहिले असता हॉल व बेडरूममधील बेड, लोखंडी कपाट उचकटून त्यातील 20 हजार रूपये किमतीचा 10 ग्रॅम वजनाचा सोन्याचा नेकलेस, 30 हजार रूपये किमतीचे 15 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे झुबे, 30 हजार रूपये किमतीच्या 15 ग्रॅम वजनाच्या तीन लहान सोन्याच्या चैन, 5 हजार रूपये किमतीच्या 2.50 ग्रॅम वजनाच्या लहान बदाम व अंगठ्या व 80 हजार रूपये रोख असा एकूण 1 लाख 65 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत तुकाराम साठे यांनी कराड ग्रामीण पोलिसात तक्रार दिली असून याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे करीत आहेत.