हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी : सुप्रिया सुळे

पुणे : माझ्या मतदारसंघात कुणीही दमदाटी करायची नाही, धमकी द्यायची नाही, नाहीतर गाठ माझ्याशी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटाला थेट इशारा दिला.
हर्षवर्धन पाटलांना धमकी द्याल तर गाठ माझ्याशी आहे..असे सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटाला सुनावले. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील मेळाव्यात सुप्रिया सुळे बोलत होत्या. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटावर हल्ला चढवला.
माझ्या मतदारसंघात दमदाटी कराल तर गाठ माझ्याशी आहे. माझा नंबर लिहू घ्या. तुम्हाला कोणाचाही फोन आला तर माझा नंबर द्या आणि सांगा की आधी सुप्रिया ताईशी बोला. मी बोलते मग, बघून घेईन, असं सुप्रिया सुळेंनी ठणकावून सांगितलं. बारामती मतदारसंघात किंवा राज्यात भाजप आणि राष्ट्रवादीमधील नेते एकमेकांना धमकी देत आहेत. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे का ? असा खडा सवाल विचारत त्यांनी अजित पवार गटाला टोला लगावला.
सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे, जसा चढता काळ येतो, तसा उतारही येतो. मला काहीच करायची गरज नाही, त्यांची सगळी मस्ती जनता लवकरच उतरवेल, असा इशाराचा त्यांनी दिला. आम्ही लोकशाहीने निवडणूक लढवत आहोत त्यामुळे आम्ही दडपशाहीला घाबरणार नाही,असंही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.