
कराड ः मोक्का व पोक्सो गुन्ह्यातील फरार संशयित आरोपीस कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने शुक्रवारी मोठ्या शिताफीने अटक केली.
अक्षय अनिल तळेकर (वय 29, रा. हरपळवाडी, ता. कराड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अक्षय तळेकर याच्यावर यापूर्वी सुद्धा अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर फेब्रुवारी 2023 मध्ये मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून तो फरार होता. फरार असताना त्याने जुलै 2023 मध्ये एका अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून तिचेवर वारंवार लैंगिक अत्याचार करून फरार झाला होता. याबाबत डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे यांना फरार संशयित आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने राजू डांगे यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, अक्षय तळेकर हा शुक्रवारी पाचवड फाटा बैलगाडी शर्यतीकरता ड्रायव्हर म्हणून येणार असल्याची खात्रीशीर माहिती राजू डांगे व प्रविण जाधव यांना मिळाली. पोलिसांनी बैलगाडा शर्यतीस येणाऱ्या शेतकऱ्यांचा पेहराव करून पाचवड फाटा येथे सापळा रचून थांबले असताना अक्षय तळेकर यास पोलिसांची चाहूल लागली. त्यामुळे तो पळून जाण्याच्या तयारीत असताना कराड शहर डीबीच्या पथकाने त्यास पाठलाग करून शिताफीने अटक केली. त्याच्या सखोल चौकशी केली असता त्याने गुन्हा केलेची कबुली दिली.
सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशि काळे, संतोष पाडळे, कुलदीप कोळी, आनंदा जाधव, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी केली.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.