भाजपाकडून करण्यात येत असलेले राजकारण हे भविष्याच्या दृष्टीने घातक : शिंदे गटाचे नेते सुरेश नवले यांची टीका

मुंबई : महायुतीचा लोकसभेतील जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. महाराष्ट्रातील अशा अनेक जागा आहेत, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमती भूमिका घेत, ती जागा भाजपाच्या पारड्यात टाकलेली आहे.
पण याच मुद्द्यावरून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेत्याने थेट नाराजी व्यक्त केली आहे. तर भाजपाकडून करण्यात येत असलेले राजकारण हे भविष्याच्या दृष्टीने घातक असल्याचे मत शिंदेच्याच नेत्याने व्यक्त केल्याने याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. जागावाटपाचा तिढा फार पूर्वीच सुटायला हवा होता. जे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले त्यांना आतापर्यंत उमेदवारी घोषित करणे अपेक्षित होते, असे मत माजी मंत्री सुरेश नवले यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात लोकसभेचे पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. परंतु, अद्यापही महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. याबाबत बोलताना शिंदे गटाचे नेते सुरेश नवले म्हणाले की, जागावाटपाचा तिढा फार पूर्वीच सुटायला हवा होता. जे विद्यमान खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले होते, त्यांना आतापर्यंत उमेदवारी घोषित करणे अपेक्षित होते. मात्र, दुर्दैवाने भाजपाच्या दबावामुळे की काय पण आजपर्यंत त्यांची उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यामुळे 12 जागांमध्ये ही स्थिती येत असेल तर 288 जागांमध्ये काय होणार? असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहात नाही, असे सांगत नवले यांनी चिंता व्यक्त केली.
तसेच, ज्या खासदारांनी स्वतःचे राजकीय आयुष्य पणाला लावून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले, त्यांनाही उमेदवारी मिळू नये म्हणू भाजपा प्रयत्न करेल तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि शिवसैनिकाच्या दृष्टीने गंभीर बाब आहे. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार केल्याशिवाय शिवसैनिक राहणार नाही, याची जाणीव भाजपाने ठेवावी, असा इशाराच माजी मंत्री सुरेश नवले यांनी दिला आहे.
तर, भाजपाकडून शिवसेनेवर अन्याय करत आहे. सर्व्हेचे रिपोर्ट विरोधात आहे. सेंट्रलचे रिपोर्ट विरोधात आहेत, असे म्हणत त्यांच्याकडून उमेदवारी नाकारण्यात येत आहे, अशी कारणे देऊन उमेदवार बदलण्याची कामे भाजपा करत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून राजकीय जीवन संपुष्टात आणण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोपही नवले यांच्याकडून करण्यात आला आहे. तसेच, जे काही घडत आहे, ते गंभीर असून याबाबतची शिवसैनिकाला चिंता वाटत असून भाजपाचे अशा प्रकारचे राजकारण घातक असल्याचे स्पष्ट मत माजी मंत्री सुरेश नवले यांनी व्यक्त केले आहे.
त्याशिवाय, विद्यमान खासदारांची तिकीट कापले जाऊ नये, ही शिवसैनिकाची भावना असून. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत असलेल्या सर्व खासदारांना उमेदवारी मिळाली पाहिजे हा आग्रह आहे. त्यामुळे भाजपाने यासाठी कोणतेही कारण देऊ नये. यवतमाळ, नाशिक, हातकणंगले, हिंगोली या जागा शिवसेनेच्या असताना या लोकसभेवर भाजपाकडून आग्रह करण्यात येत आहे. किंवा त्या जागेवरील उमेदवार बदला, असेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे भाजपाला हा आग्रह करण्याचा कोणताच हक्क नाही. आमचा पक्ष, आमचे प्रमुख नेते याबाबत निर्णय घेतील, असे प्रत्येक शिवसैनिकाचे म्हणणे असे खडेबोलही सुरेश नवले यांनी भाजपाला सुनावले आहे.
“अब की बार 400 पार” हे जे काही आहे, ते नंतर पाहता येईल. तो नंतरचा विषय आहे. अगोदर आमच्या विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली पाहिजे. हे सर्व विद्यमान खासदार एकनाथ शिंदेंमुळे युतीत आले आहेत. एकनाथ शिंदे हे सध्या असलेल्या जागांसाठी, पण भाजपा दुराग्रह करत असल्याचे सांगत माजी मंत्री सुरेश नवले यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. पण आता शिंदेंच्याच नेत्याने उघड उघड नाराजी व्यक्त केल्याने महायुतीत काहीच आलबेल नसल्याचे पुन्हा एकजा समोर आले आहे.