
कराड : केंद्र शासनाच्या उदयोन्मुख भारतासाठी पंतप्रधान शाळा अर्थात “पीएम. श्री स्कूल “साठी राज्यातील सर्वात जास्त पटसंख्या आणि गुणवत्तेत अग्रेसर असलेल्या कराड नगरपरिषद शाळा क्र.३ ची निवड केली असल्याची माहिती शासनाच्या राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निवडीमुळे शाळेस भौतिक सुविधांसाठी १ कोटी ८८ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मुख्याध्यापक कोळी म्हणाले, देशातील १५,००० शाळा या योजने अंतर्गत घेण्यात आल्या आहेत. राज्यातील ३११ शाळांची “पीएम. श्री स्कूल” साठी निवड करण्यात आली असल्याचे पत्राने राज्य प्रकल्प संचालक मुंबई प्रदिपकुमार डांगे यांनी कळविले आहे. “पीएम.श्री स्कूल” साठी शाळेला नवीन वर्गखोल्या, प्रयोगशाळा, ग्रंथालय, इमारतीची डागडूजी, अद्ययावत संगणक कक्ष, व्हच्र्युअल क्लासरुम, रंगरंगोटी, पाण्याची सुविधा याकरीता रक्कम वापरण्यात येणार आहे. यासाठी समग्र शिक्षा कार्यालयास सविस्तरपणे आराखडा पाठविण्यात आला होता.
पाचवी शिष्यवृत्ती, नवोदय, सैनिक स्कूल व विविध स्पर्धा परीक्षेसाठी शाळेचे ५०० हून अधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकले आहेत. दिल्ली येथील केंद्र शासनाच्या ‘निपा’ संस्थेने शाळेची यशोगाथा देशभर प्रसारित केली होती. तर शासनाने वेळोवेळी या शाळेचे सादरीकरण राज्यातील इतर शाळांपुढे केले आहे. सध्या शाळेची पटसंख्या २७८९ इतकी असून शाळेला स्वतःची बालवाडी आहे. तीन तालुक्यातील साठ गावचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून शाळेकडे ५२ स्कूल बस आहेत.
“पीएम.श्री स्कूल “साठी निवड व्हावी म्हणून राज्याचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, राज्य प्रकल्प संचालक प्रदिपकुमार डांगे, राज्य समन्वयक सिद्धेश वाडकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, शाळेचे आधारस्थंभ माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, शिक्षण उपसंचालक महेश चोथे, मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी प्रयत्न केले असल्याचे मुख्याध्यापक अर्जुन कोळी यांनी सांगितले.