
कराड : माल वाहतूक टेम्पो आणि दुचाकीची समोरासमोर धडक होवून वडील जागीच ठार झाले. तर बारा वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला. दुसरा पाच वर्षांचा मुलगा या अपघातातून सुदैवाने सुखरूप बचावला. कराड-चांदोली मार्गावर कालेटेक, ता. कराड गावच्या हद्दीत मंगळवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा भिषण अपघात झाला.
अंकूश मुरलीधर नडवणे (वय ४०, रा. विश्रामनगर, मलकापूर, ता. कराड) असे अपघातात ठार झालेल्याचे नाव आहे. तर मुलगा ओंकार अंकूश नडवणे (वय १२) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघातस्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील अंकूश नडवणे यांच्या तुळसण येथील नातेवाईकांचे दोन दिवसांपुर्वी निधन झाले होते. मंगळवारी त्यांचा मातीचा कार्यक्रम होता. त्यासाठी अंकूश नडवणे हे त्यांच्या ओंकार व शुभम या दोन मुलांना घेवून मंगळवारी सकाळी दुचाकीवरुन उंडाळेच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी कालेटेक गावच्या हद्दीत डीपी जैन कंपनीसमोर उंडाळेहून कराडकडे निघालेल्या माल वाहतूक टेम्पोची आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात अंकूश नडवणे हे जागीच ठार झाले. तर मुलगा ओंकार हा गंभीर जखमी झाला. पाच वर्षीय शुभमला किरकोळ दुखापत झाली. परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमी ओंकार याला तातडीने रुग्णालयात हलवले.
अपघाताची माहिती मिळताच कराड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. अपघाताची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.