
कराड ः मुलगा दारू पिऊन येऊन मारहाण करून घराबाहेर काढत असल्याच्या कारणावरून बापाने मुलाच्या डोक्यात लाकडी काठीने मारहाण केली. यामध्ये मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सचिन विलास मोहिते (वय 48 रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) यांनी कराड ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. यावरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी संशयित बापास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शरद प्रतापराव मोहिते (वय 42, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर प्रतापराव गुलाबराव मोहिते (वय 74, रा. ज्ञानेश्वर मंदिराजवळ, रेठरे बुद्रुक, ता. कराड) असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आरोपी प्रतापराव हे रेठरे बुद्रुक येथे पत्नी कमल व मुलगा शरद असे तिघेजण राहत होते. शरदला दारूचे व्यसन होते. तो अतिप्रमाणात दारू पित होता. त्याने दारूसाठी घरातील संसार उपयोगी साहित्य, धान्य, टीव्ही विकलेले होते. तसेच तो दारूच्या नशेत वडील प्रतापराव व आई कमल हिस सतत मारहाण व भांडण करून घराबाहेर काढत होता. शनिवारी पहाटेच्या सुमारासही शरद याने प्रतापराव याना मारहाण करून घराबाहेर काढले होते. त्यानंतर शरद याने प्रतापराव याना मारण्याच्या उद्देशाने अंगावरती आला. म्हणून प्रतापराव याने तेथे पडलेल्या काठीने शरदच्या डोक्यात मारले. मात्र घाव वर्मी लागल्याने शरदच्या डोक्यातून रक्त येऊन तो बेशुद्ध पडला. त्यानंतर फिर्यादी याने शेजाऱ्यांच्या मदतीने शरद याला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेहले असता डॉक्टरांनी तो मयत असल्याचे सांगितले. याप्रकरणी प्रतापराव मोहिते याच्यावर कराड ग्रामीण पोलिसात खुन्हाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांना त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.