
कराड : एटीएममधून पैसे काढून देण्याचा बहाणा करीत सेवानिवृत्त वृद्ध पोलिसाला एकाने ३० हजार रुपयांचा गंडा घातला. शहरातील विजय दिवस चौकात असलेल्या एटीएम केंद्रावर हा प्रकार घडला. याबाबत पांडुरंग दत्तू गुजर (वय ७७, रा. ओगलेवाडी, ता. कराड) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओगलेवाडी येथील पांडुरंग गुजर हे मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. शुक्रवारी, दि. ५ रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ते शहरातील विजय दिवस चौकात असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएम कक्षात पैसे काढण्यासाठी गेले होते. सुरुवातीला त्यांनी दहा हजार रुपये खात्यातून काढले. त्यानंतर पुन्हा पैसे काढण्याचा प्रयत्न करीत असताना पैसे निघाले नाहीत. त्याचवेळी एक अनोळखी युवक एटीएम कक्षात आला. त्याने मी तुम्हाला पैसे काढून देतो, असे सांगून पांडुरंग गुजर यांच्याकडून त्यांचे एटीएम कार्ड घेतले. त्यानंतर मशीनमध्ये दोन ते तीनवेळा कार्ड घालून त्याने पैसे काढण्याचा बहाणा केला. मात्र, आजोबा पैसे निघत नाहीत, असे म्हणून एटीएम कार्ड पांडूरंग गुजर यांच्या हातात देऊन तो युवक घाईगडबडीत तेथून निघून गेला. त्यानंतर पांडुरंग गुजर यांनी पुन्हा मशीनमध्ये कार्ड घालून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता मशीनमध्ये लालासो रामचंद्र मोहिते असे नाव त्यांना दिसले. त्यामुळे त्यांनी कार्ड तपासले असता ते कार्ड त्यांचे नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तातडीने ते बँक व्यवस्थापकांना भेटले. बँक व्यवस्थापकांनी पांडुरंग गुजर यांचे खाते तपासले असता त्यांनी काढलेल्या दहा हजार रुपयाव्यतिरिक्त त्यानंतर आणखी तीस हजार रुपये काढले गेले असल्याचे निदर्शनास आले.
याबाबत पांडुरंग गुजर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार रवींद्र पवार तपास करीत आहेत.