सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला

सांगली : महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत अंतिम यादी जाहीर केली. कोणत्या पक्षाला कोणता मतदारसंघ याची यादी समोर आली आहे. यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे.
सांगलीत तिन्ही पक्षांनी जागावाटप जाहीर करण्याआधीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. यानंतर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांनी नाराजी व्यक्त करत जागा काँग्रेसला द्यावी अशी मागणी केली होती. आता जागेचा तिढा सुटल्याचं जाहीर करताना सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं स्पष्ट सांगण्यात आलंय.
सांगली लोकसभेचा तिढा सुटला असून आता शिवसेना ठाकरे गटच सांगलीची जागा लढणार आहे. शिवसेनेची उमेदवारी संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर होताच जिल्ह्यातील काँग्रेस नेते नॉट रिचेबल झाले आहेत. काँग्रेस नेते विश्वजीत कदम, विशाल पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तर जिल्हा काँग्रेस कार्यालयासमोर यानंतर शुकशुकाट आहे.
आमदार विक्रम सावंत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, दीड महिन्यापासून आम्ही या जागेसाठी आग्रह केला. आतापर्यंत लोकसभा निवडणुकीत या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला आहे. पण मविआने घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. येत्या काळात आम्ही पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावू. कार्यकर्त्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ.
महाविकास आघाडीच्या निर्णयावर सांगली जिल्ह्यातल्या काँग्रेस नेत्यांची उद्या बैठक होणार आहे. विश्वजीत कदम,विशाल पाटील विक्रम सावंत,जयश्रीताई पाटील आणि पृथ्वीराज पाटील प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित असतील. कार्यकर्ते आणि नेत्यांच्या चर्चेनंतर पुढचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिली. दरम्यान, याबाबत अंतिम निर्णय हा विशाल पाटील यांचाच असेल असंही त्यांनी सांगितलं.
कोणाला किती आणि कोणत्या जागा?
शिवसेना (21) जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई उत्तर-पश्चिम, मुंबई दक्षिण-मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई उत्तर-पूर्व(इशान्य)
राष्ट्रवादी (10) बारामती, शिरूर सातारा, भिवंडी दिंडोरी म्हाडा, रावेर, बीढ, वर्धा ,अहमदनगर दक्षिण
काँग्रेस (17) : नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई