राज्यसातारा

अतुल म्हेत्रे साहेबांचा खेळ खोल, बोगस मतात अजून कोणाचा आहे रोल, लवकरच येणार समोर?  (भाग तिसरा)

कराड : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात 2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणावर बोगस मतदारांची नोंदणी झाल्याचा गंभीर आरोप तक्रारदारांकडून करण्यात आला आहे. उपलब्ध पुरावे, दस्तऐवज आणि निवडणूक यादीतील विसंगती दाखवूनही मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल म्हेत्रे यांनी बोगस नोंदणी झालेली नसल्याचे नमूद करणारा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला असून वरिष्ठांना चुकीची माहिती देत दिशाभूल केल्याचा आरोप तक्रारदारांच्या बाजूने करण्यात आला आहे. या अनुषंगाने मतदारसंघातील सर्व गावांची माहिती पुराव्यानिशी भागनिहाय सादर केली जाणार असून कापील गावातील प्रकरणाची माहिती प्रथम मांडण्यात येत आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार कापील गावामध्ये सुमारे 40 संशयित मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यातील दोन प्रकरणे पुढीलप्रमाणे सांगण्यात येतात. स्वाती सुनील मोरे व शितल सुरेश सावंत या दोन्ही व्यक्ती कापील गावच्या रहिवासी नसतानाही त्यांची नव्याने मतदार नोंदणी 2024 मध्ये कापील गावात करण्यात आली आहे. कापिल गावामध्ये घर, जमीन, रेशनकार्ड किंवा कोणताही स्थानिक रहिवासाचा पुरावा नसूनही दोघींना मतदार म्हणून समाविष्ट करण्यामागील प्रक्रिया तक्रारदारांनी संशयास्पद ठरवली आहे.

स्वाती सुनील मोरे या सांगली जिल्ह्यातील किल्ले मच्छिंद्रगड गावाच्या मूळ रहिवासी असून त्यांची मूळ मतदार नोंदणी विधानसभा मतदारसंघ 283 इस्लामपूर, भाग क्रमांक 3, सिरीयल क्रमांक 750, आयडी क्रमांक XTX6105662 या क्रमांकावर आजही अस्तित्वात आहे. त्याचप्रमाणे शितल सुरेश सावंत या सांगली जिल्ह्यातील बिचुद गावाच्या रहिवासी असून त्यांची मूळ नोंदणी विधानसभा मतदारसंघ 283 इस्लामपूर, भाग क्रमांक 19, सिरीयल क्रमांक 50, आयडी क्रमांक XTX7544505 या क्रमांकावर आजही अस्तित्वात आहे. त्यांची मूळ गावातील नावे कमी न होता त्याच व्यक्तींची कापील गावात नव्याने नवी मतदार नोंदणी झाल्यामुळे ही नोंदणी बोगस असल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.

या दोघींना कापील गावात रहिवासी असल्याचे दाखवण्यासाठी मंगल शिवाजी मोरे यांच्या नावे नोटराईज भाडेकरार करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या भाडेकरारासाठी वापरण्यात आलेला स्टॅम्प पेपर कराड किंवा परिसरातून न घेता थेट पुण्यातून आणण्यात आला आहे. हा स्टॅम्प पेपर श्री. डी. आर. भुरूक (परवाना क्रमांक 2201155), रा. धायरी, ता. हवेली, जि. पुणे यांच्या कडून 11 जानेवारी 2024 रोजी खरेदी करण्यात आला असून त्यावर दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी नोटराईज भाडेकरार करण्यात आला आहे. तक्रारदारांचा आक्षेप असा आहे की केवळ नोटराईज भाडेकराराच्या आधारे आधार कार्ड वरील रहिवाशीचा पत्ता बदलता येत नाही. तरीही या दोन्ही व्यक्तींनी कापील गावाचा रहिवासीचा पत्ता आधार कार्ड वरती नोंदवून घेतला आहे. तसेच त्यांच्याकडे त्यांच्या मूळ गावाच्या पत्त्याचे आधार कार्ड ही उपलब्ध आहेत. त्यांनी त्यांच्या मुळ गावचे पत्ता असणारे आधार कार्ड वरती कापील गावचा पत्ता बदलताना सादर केलेली कागदपत्रे कोणती होती.

या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आणि संबंधित व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी तक्रारदारांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. मात्र कारवाई न झाल्याचा आरोप करत, उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या बाहेर गेल्या 51 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरु आहे. आंदोलनकर्त्यांचे मत आहे की गंभीर कागदपत्रीय पुरावे असूनही चौकशी न करणे आणि संबंधितांवर कोणतीही कारवाई न होणे हा निवडणूक प्रक्रियेवरील लोकशाहीचा विश्वास डळमळीत करणारा प्रकार आहे.

तक्रारदारांच्या मते कापील गावातील ही फक्त सुरुवात असून अशाच प्रकारच्या बोगस नोंदी मतदारसंघातील इतर गावांमध्येही झालेल्या आहेत. कापील गावातील सर्व पुरावे सादर केल्यानंतर प्रत्येक गावाची माहिती पुराव्यानिशी सादर करण्यात येणार आहे.

पुढील भागात – कापिल गावामध्ये अतुल म्हेत्रे साहेबांनी वाढलेल्या बोगस मतदारांचा मेळ अजून शिल्लक आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close