अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय माढ्याला परतणार नाही : जानकर

पुणे : बारामती लोकसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे. पहिल्यांदाच पवार कुटुंबातील दोन व्यक्ती एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. एकीकडे अजित पवार यांनी आपली संपूर्ण ताकद बारामतीत लावली आहे.
तर दुसरीकडे शरद पवारही मागे नाहीत. त्यांनीही आपले डावपेच आखायला सुरुवात केली आहे. माढा लोकसभेचं गणित बसवताना धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर यांनी आपल्याकडे वळवण्यात यश आलं होतं. जानकर आता बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी थेट अजित पवार यांनाच आव्हान दिलं आहे.
अजित पवार यांच्या पक्षाचा पहिला जो स्टॅम्प द्यावा लागतो, तो मी दिला असून मी परवा माझ्या भाषणात सांगितलं की अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परत येणार नाही. शरद पवार साहेबांचे घड्याळ चोरून नेले आहे. ते अजित पवारांच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावर येऊ शकत नाही. राज्यातल्या सरकारला सरकार चालवण्यासाठी अजित पवारांची गरज नव्हती. मात्र, सह्याद्री सारखे स्वाभिमान असलेले साहेब आणि त्यांची बारामती संपवायची. या भागातील नेतृत्व नामशेष करून जसं मला व मोहिते पाटलांना संपवलं त्याच पद्धतीने अजित पवारांना देखील याच तालुक्यात पाल ठोकून ठेवायचं असा डाव भाजपचा असल्याचा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे. ते इंदापूर तालुक्यातील लाखेवाडी येथे सभेत बोलत होते.
माळशिरस तालुक्यातले पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या मोहिते जानकरांच्या भूमिकेने माढा लोकसभेची लढत लक्षवेधी वळणावर आलीय. भाजपने विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहितेपाटील, रामराजे नाईक निंबाळकर असे प्रमुख राजकीय गट नाराज होते. त्यामुळे धैर्यशील मोहिते पाटलांनी अखेर शरद पवार गटात प्रवेश करत तुतारीच्या चिन्हावर निवडणूक अर्ज दाखल केलाय. रणजित नाईक निंबाळकारांच्या विरोधात वारं असल्याने फडणवीसांनी उत्तम जानकर यांना आपल्या बाजूने वळवून घेण्यासाठी नागपूरला बोलवून घेतलं होतं. अगदी त्यासाठी खाजगी विमान पाठवण्यात आलं होतं. नागपूरला फडणवीसांकडे जाऊन जानकरांनी पाठिंबा ही दर्शवला मात्र ते परत आल्यावर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत शरद पवारांनाच पाठिंबा द्यावा अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे बॅकफूटवर आलेले जानकर आज मोहिते पाटलांसोबत पवारांना भेटले. उद्देश एकच माळशिरस विधानसभेत मोहिते पाटलांनी मदत करण्याचा शब्द द्यावा.