
कराड : येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते शिक्षक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर सह्याद्री मंगल कार्यालयानजीक गांजाची बेकायदेशीररित्या वाहतूक करताना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने एकाला ताब्यात घेऊन अटक केले. त्याच्याकडून सुमारे दोन किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. बुधवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
भीमराव इबरसू कट्टीमनी (वय २३, रा. खराडे कॉलनी, कार्वेनाका, कराड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम ते शिक्षक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एकजण दुचाकीवरून गांजाची वाहतूक करणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांना मिळाली. त्याबाबत त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के. एन. पाटील यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्यासह गुन्हे शाखेचे पथक रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सह्याद्री मंगल कार्यालयाजवळ थांबले. त्यावेळी भीमराव कट्टीमनी हा दुचाकीवरून जाताना पोलिसांना दिसला. पोलीस पथकाने त्याला थांबवले. दुचाकीच्या हॅण्डलला असलेली पिशवी पोलिसांनी तपासली असता त्यामध्ये ३५ हजार रुपये किमतीचा १ किलो ९०० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला. तसेच भीमराव कट्टीमनी याला ताब्यात घेऊन अटक केले. गुरुवारी त्याला मिळाल्यास हजर केल्यास कारण न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.