राज ठाकरेनी नारायण राणेंची वकिली करु नये : संजय राऊत

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेवरुन आता उद्धव ठाकरे गटाचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरेंना नकली अंधभक्त म्हणत निशाणा साधला. तसेच राज ठाकरे नारायण राणेंची वकिली करत असल्याचा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना लगावला. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला जात असताना नारायण राणे आणि राज ठाकरेंनी तोंड तरी उघडलं का? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. तसेच राज ठाकरेंनी कोकणातील प्रकल्पांना विरोध का होत आहे हे समजून घेण्याची गरज असल्याचंही राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन नारायण राणेंना खोचक टोले लगावले. राऊत राणेंबद्दल काय काय म्हणाले ते पाहूयात राऊतांच्या प्रत्युत्तरामधील ठळक मुद्दे…
राज ठाकरेंनी नारायण राणेंना निवडून देण्यासंदर्भात आव्हान करताना बाकं बडवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रीमंडळात जाऊन काम करणारे? असा प्रश्न उपस्थितांना विचारला. यावरुनच राऊत यांनी ‘मुळचटगिरी करुन, दहा पक्षांतर करुन मंत्रीपद भोगणं हा विकास? बाकं बडवणाऱ्या खासदारांनी देश वाचवला आहे. त्यांनी लोकशाही वाचवली आहे. बाकं बडवणाऱ्या 140 खासदारांना निलंबित केलं आहे हे माहिती आहे का? बाकं बडवून मोदींना लोकशाही संदर्भात सवाल विचारणाऱ्या 140 खासदारांना मोदी-शाहांना निलंबित केलं. ही बाकं बडवणाऱ्यांची ताकद आहे,’ असं म्हणत नारायण राणेंना टोला लगावला.
मोदी-शाहांनी महाराष्ट्रातील जे प्रकल्प पळवून नेले त्याबद्दल नारायण राणेंनी एकदा तरी तोंड उघडलं का? मुंबईतील, महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प नेले. महाराष्ट्राची लूट सुरु आहे. यावर नारायण राणे-राज ठाकरेंनी एकदा तरी तोंड उघडलं का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
तुम्हाला बाकं बडवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रीमंडळात जाऊन काम करणारे खासदार हवेत, म्हणजे नेमकं काय? नारायण राणेंनी मोदींच्या मंत्रीमंडळात जाऊन काय दिवे लावले? कोकणासाठी आणि महाराष्ट्रासाठी काय दिवे लावले याचा खुलासा त्यांची वकिली करणाऱ्यांनी करायला हवा, अशी मागणीही संजय राऊत यांनी केली.
“रोजगार देणारे, महसूल देणारे, महाराष्ट्र घडवणारे प्रकल्प राज ठाकरेंच्या प्रिय मोदी-शाहांनी गुजरातला पळवायचे. महाराष्ट्राचा विद्धवंस आणि विनाश करणारे प्रकल्प माथी मारायचे. आमचे शेती, मत्सव्यवसाय, फळबागा, आंबे, काजू यांचं नुकसान करायचं. त्याला विरोध केल्यावर कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची,” असं म्हणत राणेंच्या समर्थनार्थ सभा घेणाऱ्या राज ठाकरेंवर राऊतांनी निशाणा साधला.