राज्यसातारा

कराड तहसील कार्यालयात भानगडबाजांचा सुळसुळाट

अधिकाऱ्यांवर स्वतःच्या व पै-पाहुण्यांच्या कामासाठी दबाव टाकण्याचे प्रकार सुरू ः संघटना, समाजसेवक, राजकीय पदाधिकारी आघाडीवर

कराड ः कराड तहसील कार्यालयात स्वतःची व आपल्या पै पाहुण्यांची भानगडीतील कामे करणाऱ्या लोकांची रहदारी सध्या वाढलेली दिसत आहे. अधिकाऱ्यांना कामे करण्यासाठी दमदाटी करणे. त्यांच्यावर राजकीय, सामाजिक क्षेत्रातून दबाव आणणे याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येत आहे. यामध्ये संघटनेच्या नावाखाली पदाधिकारी म्हणा किंवा स्वतःला समाजसेवक म्हणणारे तसेच आमदार, खासदारांची नावे सांगून येणारे सफेदपोश पुढारी असतील. या सर्वांच्या त्रासामुळे अधिकाऱ्यांना कामे करणे अवघड झाले आहे.

कराड तहसील कार्यालयात सकाळी अधिकारी वर्ग यायच्याअगोदर तेथे अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करणाऱ्यांची टोळी पोहचलेली असते. काहीजण आपली स्वतःची पोळी भाजून घेण्याकरीता अधिकाऱ्यांवरती कोणत्याही स्तराला जावून दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना कामे करताना अडचणी येऊ लागल्या आहेत. यामध्ये गौणखनिज असेल, रस्त्यासंदर्भातील समस्या असतील, जमिनीच्या बाबतीतील तक्रारी असतील या विभागात सध्या याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसत आहे. मी अमुक संघटनेचा पदाधिकारी, मी तमुक आमदार, खासदाराचा पदाधिकारी आहे, मी सामाजिक कार्यकर्ता आहे असे सांगून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून आपली कामे करून घेण्यात यांचा हातकंडा आहे. आणि त्यातून जर आपली कामे झाली नाहीत तर अधिकारी व कर्मचाऱ्यांवरती बदनामीचे शिंतोडे उडवण्याचे प्रमाण वाढले आहे. आणि त्यातूनही जर काही झाले नाही तर त्यांच्या नावे तक्रारी अर्ज करायचे हा सगळा प्रकार गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे.
गौणखनिज, रस्ते, जमिनी व्यवहार या विभागात स्वतःची व पै पाहुण्यांची भानगडीतील कामे करणाऱ्या  लोकांकडून माहिती अधिकारात माहिती मागविण्याचे प्रकार वाढले आहेत. माहिती मिळाली की त्यानंतर त्याला ब्लॅकमेल करून त्याच्याकडून अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करून पैसे उकळणे असे प्रकार सुरू आहेत. यामध्ये स्वतःला समाजसेवक समजणारे सर्वात जास्त पुढे असल्याची चर्चा तहसील आवारात सुरू आहे.

कराड तहसील कार्यालयात गौणखनिज, रस्ते, जमिनी व्यवहार या विभागात स्वतःची व आपल्या पै-पाहुण्यांची कामे करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्यासाठी आमदार, खासदारांसह संघटनेचे पदाधिकाऱ्यांचा सुद्धा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या सफेद पोश पुढारी व संघटनेच्या नावाखाली ब्लॅकमेल करणाऱ्यांचा लवकरच पर्दापाश होणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close