क्राइमराज्यसातारा

इचलकरंजीच्या माजी नगरसेवकाच्या हत्येचा कट रचणाऱ्या टोळीला कराडात अटक

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई, तीन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते, चाकू असा मुद्देमाल जप्त

सातारा  : कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील पाच संशयितांच्या टोळीला धरपकड करून कराडमध्ये जेरबंद केले. ही टोळी इचलकरंजी जि. कोल्हापूर येथील एका माजी नगरसेवकाच्या हत्येचा कटासाठी पैसे जमविण्याच्या हेतूने कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. त्याआधीच पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत पोलिसांनी संशयतांकडून दोन दुचाकीसह तीन देशी बनावटीची पिस्तुले व घातक हत्यारे असा एकून तीन लाख 37 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी दिली.

सातारा येथील पोलीस मुख्यालयात सदर कारवाईबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

बबलु उर्फ विजय संजय जावीर (वय 32) रा. शहापुर ता. हातकणंगले जि. कोल्हापूर, निकेत वसंत पाटणकर रा. गोडोली ता.जि. सातारा, सुरज नानासो बुधावले रा. विसापूर, ता. खटाव जि. सातारा, राहुल अरुण मेनन रा. केरळ (सध्या रा. विद्यानगर, कराड) तर पळून गेलेल्या आकाश आनंदा मंडले रा. खटाव जि. सातारा या संशयिताला मंगळवारी पोलिसांनी अटक केली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड ही जिल्हयातील मोठी बाजारपेठ व पुणे-बेंगलोर महामार्गावरील मध्यवर्ती शहर असून शहराला शहराला मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यामुळे शहरातील या घडामोडींकडे व तसेच रेकॉर्डवरील संशयितांच्या हालचालीवर नजर ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी शहर पोलिसांना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर सोमवार, दि. 20 रोजी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरात गस्त घालत होते. यादरम्यान विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली. त्यांनतर तात्काळ त्याठिकाणी जावून कारवाई करणेबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेस वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून सुचित करण्यात आले. याबाबतची माहिती मिळताच विद्यानगर परिसरात अगोदर गस्त घालत असलेले पोलीस हवालदार शशिकांत काळे व संग्राम पाटील हे तातडीने संशयितांच्या फ्लॅटवर पोहोचले. पोलिसांची चाहूल लागताच संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी हवालदार शशिकांत काळे व हवालदार दिग्विजय सांडगे यांनी संशयितांवर झडप घातली. त्यावेळी संशयितांची आणि पोलिसांची झटापट झाली. तरीही पोलिसांनी पाठलाग करून दोघांना पकडले, काही वेळातच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, पोलीस अंमलदार अमित पवार, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, संग्राम पाटील, महेश शिंदे यांचे पथक घटनास्थळी आले. या पथकाने आणखी दोघांना पकडले. दरम्यान, एकजण पसार झाला.

या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपींच्या टोळीकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले, चार जिवंत काडतुसे, एक धारधार सुरा, दोन कोयते व इतर दरोडयाचे साहित्य दोन दुचाकी असा एकून तीन लाख 37 हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत केला. अटक केलेल्या संशयित आरोपींवर याआधी खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, आर्म अॅक्ट यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.‌

सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. रोहित फार्णे, कराड शहर गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, सहाय्यक फौजदार विवेक गोवारकर, संजय देवकुळे, हवालदार शशिकांत काळे, अमित पवार, प्रविण काटवटे, सचिन सुर्यवंशी, कुलदिप कोळी, संतोष पाडळे, अनिल स्वामी, महेश शिंदे, दिग्वीजय सांडगे, संग्राम पाटील, धीरज कोरडे, मुकेश मोरे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ, संदिप शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखा सातारा येथील पोलीस हवालदार शरद बेबले, प्रविण फडतरे, शैलेश फडतरे, साबीर मुल्ला, अविनाश चव्हाण, रोहित निकम, मयुर देशमुख, मोहसिन मोमीन यांच्या पथकांनी केली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close