क्राइमराज्यसातारा

कराडात महिला वाहतूक पोलिस कर्मचाऱ्यास दमदाटी

कराड : कराडात महामार्गावर उलट्या दिशेने प्रवास करताना रोखल्यावर महिला वाहतूक पोलिसाला एका युवकाने दमदाटी केली. माझ्यावर कारवाई करण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत, असे म्हणत दंड कर मग बघून घेतो, अशी धमकीच त्याने दिली. अखेर या युवकाला हिसका दाखवत पोलिसांनी त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कराडच्या वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी प्रियांका यादव या मलकापूर येथे महामार्गावर हॉटेल नवरंगसमोर कर्तव्य बजावत होत्या. मलकापूर फाटा ते कोल्हापूर नाका यादरम्यान नव्या उड्डाणपुलाचे काम वेगाने सुरू असल्याने उलट्या बाजुने वाहने चालवण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, एक युवक दुचाकीवरुन उलट्या दिशेने प्रवास करताना वाहतूक कर्मचारी प्रियांका यादव यांच्या निदर्शनास आला. त्यांनी संबंधित युवकाला थांबवले. तसेच वाहतूक कोंडी असून उलट दिशेने प्रवास करणे नियमबाह्य असल्याचे त्यांनी युवकाला सांगीतले. संबंधित युवकाच्या दुचाकीला नंबरप्लेट नव्हती. त्याबाबतही पोलीस कर्मचारी यादव यांनी युवकाकडे विचारणा केली. मात्र, दुचाकी अडवल्याचा राग मनात धरुन त्या युवकाने पोलीस कर्मचारी यादव यांच्यावरच आरेरावी केली. तुम्ही मला नियम सांगू नका. मला हे विचारण्याचे अधिकार तुम्हाला नाहीत. माझ्यावर दंडाची कारवाई केली तर बघून घेतो, अशी दमदाटी त्या युवकाने केली. तसेच त्यानेच या वादावादीचे चित्रीकरण आपल्या मोबाईलमध्ये केले. वाहतूक कर्मचारी प्रियांका यादव यांनी त्या युवकाला अडविण्याचा प्रयत्न केला असता तो त्यांना न जुमानता तेथून निघून गेला.

दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जगदाळे, गृहरक्षक दलाचे प्रणय लोकरे यांनी काही अंतरावर संबंधित युवकाला अडवून ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर वाहतूक पोलीस कर्मचारी प्रियांका यादव यांच्या तक्रारीनुसार संबंधित युवकावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close