
कराड : बचत गटातून कर्ज काढून घरात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. मलकापुरातील तुळजाईनगर येथील सृष्टी अपार्टमेंटमध्ये गुरुवारी भरदिवसा ही घटना घडली. याबाबत अमित धनाजी शिंदे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर आतील तुळजाईनगरमध्ये नवरंग हॉटेलमागे असलेल्या सृष्टी अपार्टमेंटमध्ये अमित शिंदे हे पत्नी व मुलांसह राहण्यास आहेत. दोन दिवसांपूर्वी अमित शिंदे यांच्या पत्नीने महिला बचत गटातून दोन लाख रुपयांचे कर्ज काढले होते. ते पैसे त्यांनी घरातील कपाटात आणून ठेवले होते. गुरुवारी अमित शिंदे हे पत्नी व मुलांना सोबत घेऊन दुचाकीवरून देवदर्शनासाठी कोल्हापूरला गेले होते. घरातून बाहेर पडताना त्यांनी घराच्या दरवाजाला कुलूप लावले होते. तसेच स्वत:चा मोबाईलही बंद ठेवला होता. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता ते देवदर्शन करून घरी परत आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
शेजाऱ्याकडे चौकशी केली असता दुपारी दीड वाजल्यापासून घराचा दरवाजा उघडा असल्याचे अमित शिंदे यांना समजले. त्यामुळे सकाळी अकरा ते दुपारी दीड वाजेपर्यंत ही चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तसेच याबाबतची माहिती कºहाड शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज ताब्यात घेतले आहे. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक मारुती चव्हाण तपास करीत आहेत.