‘शरद पवारांच्या मदतीसाठी नरेंद्र मोदी पुढे आले, अन्.’ पंतप्रधानांच्या ‘त्या’ कृतीने सर्वांचेच मन जिंकले

नवी दिल्ली : नवी दिल्लीत 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन झाले.
डॉ तारा भवाळकर या संमेलनाच्या अध्यक्षा आहेत. तर शरद पवार स्वागताध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहणे आहेत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार हे एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. यावेळी दोघेही नेते शेजारी बसल्याचे दिसून आले. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या कृतीने उपस्थितांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधान मोदींनी असे काही केले की पस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
शरद पवार हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. यावेळी पवारांनी भाषण केले. त्यानंतर ते त्यांच्या खुर्चीवर येऊन बसत होते. त्यावेळी शेजारीच बसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांना खुर्चीवर बसण्यास मदत करण्यासाठी पुढे आले. मोदींनी त्यांना खुर्चीवर बसण्यासाठी मदत केली. तसेच, स्वत: बाटलीतील पाणी ग्लासात घेऊन पवारांना दिलं. पंतप्रधानांच्या या कृतीने उपस्थितांचे मन जिंकल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्याचे दिसून आले. दीपप्रज्वलनावेळी पंतप्रधान मोदींनी स्वतः पवारांना पुढे येण्यास सांगितले. तसेच, यावेळी पवार अन् मोदींनी एकमेकांचा हात धरलेला दिसला.
दरम्यान, साहित्य संमेलनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी मराठीतून भाषण केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांचे भाषण झाले. तेव्हा मी म्हटले की फारच छान, तर त्यांनी मला गुजरातीमधून उत्तर दिले. मला पण गुजराती आवडायची असे त्यांनी म्हटले. देशाच्या आर्थिक राजधानीमधून देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व सारस्वतांना माझा नमस्कार’
‘आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. तुम्ही दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवस सुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके, म्हणजे मराठी भाषा ही अमृताहूनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझं प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न नेहमी केला आहे’, असेही ते पंतप्रधान मोदी म्हणाले.