ताज्या बातम्याराजकियराज्य

ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश

मुंबई : शनिवारी गडकरी रंगायतनमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या अनिता बिर्जे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

ठाण्यातील आनंदआश्रमात येऊन बिर्जे यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिवसेनेच्या जडणघडणीच्या कालखंडात अनिता बिर्जे यांनी तत्कालीन शिवसैनिकांच्या साथीने शिवसेनेची महिला आघाडी तळागाळात पोहोचवली होती.

एकनाथ शिंदे यांनी पक्षात उठाव करून पुन्हा सत्तास्थापना केली तेव्हा अनिता बिर्जे यांनी या निर्णयाला विरोध करून उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यांची शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेतेपदी वर्णी लागली. मात्र त्यांनी आता शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार हे सर्वसामान्य लोकांना न्याय देण्यासाठी काम करत असून, ते पटल्यामुळेच आपण त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं यावेळी बिर्जे यांनी सांगितलं.

अनिता बिर्जे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे स्वर्गीय आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला नवीन बळ मिळाले आहे. शिवसेनेची वाघीण पुन्हा एकदा पक्षात सक्रिय होत असल्याचा आनंद आहे. त्यांच्या आजवरच्या अनुभवाचा फायदा आगामी काळात पक्षाला नक्की होईल. ठाणे जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी अधिक मजबूत होऊन, जोमाने काम करेल असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

यावेळी ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, माजी नगरसेवक राम रेपाळे, माजी नगरसेवक रमाकांत मढवी, टेम्भी नाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे आणि ठाणे शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close