राज्यसातारा

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री निसर्गप्रेमींनी आनुभवला अरण्यथरार

कराड : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाकडून बुद्ध पौर्णिमेनिमित्त घेण्यात आलेल्या “निसर्गानुभव कार्यक्रम २०२४” अंतर्गत पार पडलेल्या मचाणावरील वन्य प्राणी गणनेत निसर्गप्रेमींना २०० हून अधिक वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. बुद्ध पौर्णिमेला म्हणजे २३ मे ला ‘निसर्गानुभव कार्यक्रम २०२४’ निमित्त निवडक ८१ निसर्गप्रेमींना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील पाटण, कोयना, बामणोली, कांदाट, चांदोली, ढेबेवाडी, हेळवाक आणि आंबा या वन परिक्षेत्रांतील जंगलातील ८१ मचानावर बसून अरण्यवाचनाचा थरारक अनुभव घेण्याची संधी मिळाली. ढगाळ वातावरण, दाट धुके व पाऊस असूनसुद्धा अपुऱ्या प्रकाषात पार पडलेल्या या गणनेत बिबट्यासह एकुण १६ सस्तन वन्य प्राणी प्रजातींचे तसेच ११ वन्य पक्षी, परीसृप प्रजातींचे दर्शन निसर्गप्रेमींना घडले आहे.

निसर्गानुभव कार्यक्रम २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी याबरोबरच नगर, पुणे, मुंबई येथूनही निसर्गप्रेमींनी हजेरी लावली होती. निसर्गप्रेमींकडून भरून घेण्यात आलेल्या अभिप्रायांनुसार गणनेसाठी सहभागी झालेल्या निसर्गप्रेमींनी निसर्गानुभव कार्यक्रम व त्याकरिता दिलेल्या सोईसुविधांबाबत संतुष्टता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सर्व मचाणींवर वन्यप्राण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दर्शन घडले आहे. मचाणावर निसर्गप्रेमींना गणनेची माहिती भरण्याकरीता प्रपत्र देण्यात आले होते. रात्रभर जागे राहून पानवठ्यावर पाणी पिण्यासाठी आलेल्या प्राण्यांची नोंद निसर्गप्रेमीं कडून करण्यात आली. सदर नोंदीनुसार त्यांना ८१ मचाणींवर दोनशेहून अधिक वन्यप्राण्यांचे दर्शन घडले आहे. निसर्गानुभव कार्यक्रमासाठी उपस्थित प्रगणकांना व्याघ्र प्रकल्पातर्फे भेट म्हणून निसर्ग पुस्तके तसेच टी-शर्ट, कॅप भेटस्वरूपात देण्यात आले.
निसर्गानुभव कार्यक्रम २०२४ मध्ये सहभागी होण्यासाठीचे गुगल फॉर्म www.mahaforest.gov.in वर उपलब्ध करून देण्यात आले होते. सामान्य नागरिकांना त्यांच्या रोजच्या धकाधकीच्या जीवनातून थोडा वेळ काढून त्यांना निसर्गाची अनुभूती घेता यावी, रात्रीचे जंगल, वन्य प्राण्यांचे आवाज, निशाचर प्राण्यांची वर्तणुक इत्यादी रंजक माहिती मिळावी या उद्देशाने या वर्षी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातर्फे “निसर्गानुभव कार्यक्रम २०२४” राबविण्यात आला होता. निसर्गानुभव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व्याघ्र प्रकल्पाच् क्षेत्र संचालक श्री. एम. रामानुजम, उपसंचालक कोयना श्री. उत्तम सावंत तसेच उपसंचालक चांदोली श्रीमती नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पातील आठ वनक्षेत्रपाल यांनी परिश्रम घेतले.
दिनांक ०५ जानेवारी २०१० रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प अस्तित्वात आला आहे. त्याचे एकूण क्षेत्रफळ हे ११६५.५७ चौ. किमी. आहे. व्याघ्र प्रकल्प हा सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यात येतो. पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा एकमेव आहे. येथिल जंगल हे सह्याद्रीतील उर्वरीत घनदाट व चांगल्या श्रेणीतील शिल्लक राहिलेले जंगल आहे. पश्चिम महाराष्ट्राला समृद्ध करणाऱ्या कोयना व वारणा जलाशयाचे गाळाने भरण्यापासून संरक्षण हे जंगल करीत आहे. १५ नद्यांचा उगम या जंगलातून होतो. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा भाग असलेले कोयना वन्यजीव अभयारण्य आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे युनेस्कोने घोषित केलेले “जागतिक नैसर्गिक वारसास्थळ आहे. तसेच Birdlife International या जागतिक संस्थेने ‘Important Bird Area’ म्हणून घोषित केले आहे. येथिल जैवविधतेसाठी व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे.
Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close