
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्धिकी यांच्या हत्येनंतर आता देशभरात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचं नाव चर्चेत आहे. अभिनेता सलमान खानचा कट्टर विरोधक असलेल्या बिश्नोई गँगने या हत्येची जबाबदारी घेतली असतानाच आता महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
त्याला कारण देखील तसंच आहे. लॉरेन्स बिश्नोई आता राजकारणात एन्ट्री करतो की काय? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे. लॉरेन्स बिश्नोई याला आता थेट महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आहे.
साबरमती मध्यवर्ती कारागृहात बंद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याला उत्तर भारतीय विकास सेना या पक्षाकडून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवण्याची ऑफर मिळाली आहे. उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत आहे. त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिश्नोई यांना पत्र लिहिलं अन् महाराष्ट्रात निवडणूक लढवण्याची विनंती केल्याची माहिती मिळाली आहे.
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी यावेळी धक्कादायक वक्तव्य केलंय. आम्ही तुमच्यामध्ये शहिद भगतसिंग यांना बघतो. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, बिहार, झारखंड, उत्तराखंड आणि इतर पाच उत्तर भारतीय राज्यांतील लोक उत्तर भारतीय आहेत. मग जर भारत एक युनिट असेल तर आपण या अधिकारापासून वंचित का आहोत? असा सवाल सुनील शुक्ला यांनी केलाय. त्यावेळी त्यांनी लॉरेन्स बिश्नाईला जिंकून देण्याचं आश्वासन देखील दिलंय.
आम्ही तुम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव देत आहोत. उत्तर भारतीय विकास सेनेचे कार्यकर्ते आणि अधिकारी तुम्ही उत्तम कामगिरीने निवडणूक जिंकून देऊ, असं सुनील शुक्ला यांनी म्हटलंय. आम्ही तयार आहोत, फक्त आम्ही तुमच्या उत्तराची वाट पाहतोय, असं देखील या पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, बाबा सिद्दीकींच्या हत्येचाही संबंध लॉरेन्स बिश्नोई टोळीशी असल्याने सध्या त्याच्या नावाचा वापर होत असल्याचं बोललं जातंय. बिश्नोई गेल्या 9 वर्षांपासून साबरमती तुरूंगात आहे. अनेक खटल्यांमध्ये लॉरेन्स बिश्नोई याचं नाव आल्याने भारत नव्या दाऊदला पोसतोय का? असा प्रश्न सामन्य नागरिक विचारत आहेत.