
कराड : सातारा जिल्ह्यामध्ये शासनास जादा महसूल हा आजपर्यंत कराड तालुक्याने दिला आहे. कराड तालुक्यात कोळेवाडी, सुर्ली, मसूर, शेनोली, घारेवाडी तसेच इतर गावांमध्येही दगड खाणी आहेत.
कराड तालुक्यात चालू असलेल्या गौणखनिज व्यवसायातून शासनास चांगला महसूल गोळा होतो. परंतु गेल्या कित्येक वर्षापासून कराड तालुक्यात ज्या गावापासून सर्वात जास्त महसूल मिळत होता त्या गावातून शासनास गौणखनिजचा एक रुपया ही मिळत नसल्याचे शासकीय आवारात चर्चा सुरू असते.
मौजे नांदलापूर गावामध्ये एकूण 17 खाणी आहेत. त्यामध्ये 7 खाणी शासकीय जागेमध्ये आहेत. तर 10 खाणी खाजगी मालकांच्या जागेमध्ये आहेत. परंतु या सर्व खाणी काही वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे शासनास येथून एक रुपयाचाही महसूल मिळत नाही. ज्या वेळेस या सर्व खाणी चालू होत्या या खाणीच्या व्यवसायामुळे अनेक बाहेरील लोक येथे येऊन त्यांचा व त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. गावातील व शेजारील गावातील लोकांना या खान व्यवसाय मधून चांगले उत्पन्न मिळत होते.
नांदलापूर गावाने कराड तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त रोजगार उपलब्ध करून दिला होता. या खान व्यवसायामुळे गावामध्ये बाहेरून अनेक कुटुंब भाड्याने खोल्या घेऊन राहू लागले. कुणाचे घरचे लोक बरोबर नसतील तर ते लोक गावातील कोणाच्याही घरामध्ये जेवणासाठी मेस लावून त्यांच्या जेवणाची सोय करत होते. खान व्यवसायामुळे गावातील लोकांना जेवणाच्या माध्यमातून किराणा दुकान, कपड्याचे दुकान, पानपट्ट्या, खोली भाडे इतर माध्यमातून चार पैसे मिळून त्यांच्या संसाराला हातभार लागत होता.
गावातील व शेजारील गावातील काही लोकांनी कर्ज काढून तर काही लोकांनी घरातील दागिने गहाण ठेवून क्रेशर व्यवसाय चालू केला. त्या व्यवसायासाठी काही लोकांनी ट्रॅक्टर व इतर वाहने व्यवसायासाठी घेऊन ते आपला व आपल्या कुटुंबाचा या व्यवसायावरून उदरनिर्वाह करत होते. सगळ्यांचे दिवस आनंदाचे होते.
परंतु काही लोकांची याला नजर लागली व या सर्व चालू खाणी बंद पाडल्या. या व्यवसायातून बाहेरगावाहून आलेल्या हजारो लोकांच्या वरती उपासमारीची वेळ आली. आज उद्या कधीतरी ह्या खाणी चालू होतील या आशेने अनेक दिवस व्यवसाय करणारी मंडळी शासनाकडे हेलपाटे मारीत होते. परंतु या खाणी काही चालू झाल्या नाहीत.
त्यामुळे बाहेरगावातून आलेले हजारो लोक नांदलापूर गावातून निघून गेले ते निघून गेलेली लोक त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कुठेही काम करतील पण गावातील व शेजारील गावातील लोकांनी कर्ज काढून चालू केलेल्या व्यवसायाचे काय?, ज्यांनी दागिने गहाण ठेवून हप्त्यावरती वाहने खरेदी केली होती त्यांचे काय?,
जे लोक या व्यवसायासाठी नांदलापूर गावामध्ये स्थायिक झाली होती ज्यांच्यापासून गावातील अनेक कुटुंबांना त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी या लोकांच्या पासून जे काय उत्पन्नाचे साधन होते ती लोक निघून गेल्यामुळे गावातील अनेक कुटुंबाचे मोठे नुकसान झाले याला जबाबदार कोण?
क्रमश :