
मुंबई : दिवाळीच्या सणामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांची तब्बल तीनवेळा भेट झाली. त्यामुळे काका-पुतण्यांचं नेमकं चाललंय काय? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांबद्दल एक विधान केलंय.
बावनकुळेंना पत्रकारांनी अजित पवारांबद्दल विचारलं असता ते म्हणाले की, अजित पवार अत्यंत चांगले नेते आहेत. यांच्याविषयी आमच्या मनात कोणतीही वेगळी भावना नाही. ते चांगल्या प्रकारे महायुतीचं काम करत आहेत. त्यांच्या रूपाने एक चांगले नेते महायुतीला मिळाले आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलले की, तीन-तीन बॅट्समन महायुतीमध्ये आहेत. कालही आपण मॅच जिंकलो आणि फायनही जिंकू.
तिघे बॅट्समन…महायुतीमध्ये तिघेही नेते बॅट्समनही आहेत आणि बॉलरही आहेत. त्यामुळे काळजी करू नका. या महाराष्ट्रात शतकंच शतकं होणार आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीत तुम्हाला शतकं पाहायला मिळाली. निवडणुका लागल्या तर महापालिकेतही आणि इतरही ठिकाणी तुम्हाला शतकंच पाहायला मिळतील.