
कराड : कराड शहर परिसरातील विद्यानगर परिसरातून दि. 5 डिसेंबर 2023 रोजी एक बुलेट चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाने बुलेट व दुचाकी चोरणाऱ्या दोन जणांना ताब्यात घेऊन अटक केली. तसेच त्यांच्याकडून एक बुलेट व एक मोटर सायकलसह एक लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
संकेत सतिश वायदंडे (वय 22) रा. मल्हारपेठ (नारळवाडी), ता. पाटण व सार्थक चंद्रकांत पाणस्कर (वय 29) रा. मल्हारपेठ (पाणस्करवाडी) ता. पाटण अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कराड शहर परिसरातील विद्यानगर परिसरातून दि. 5 डिसेंबर 2023 रोजी एक बुलेट चोरीस गेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकास तात्काळ गुन्हाचा छडा लावण्याबाबत आदेशित केले होते. त्यानुसार सदर गुन्हयाचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा प्रमुख पोलीस उप निरीक्षक राज डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक कुलदिप कोळी हे करत होते. दि. 3 जानेवारी 2024 रोजी कराड शहरात गस्त घालताना वारुंजी फाटा येथे दोन इसम संशयितरित्या बुलेटवर उभे असल्याचे दिसून आले. संबंधितांना पोलीस उप निरीक्षक राज डांगे व त्यांच्या पथकाने ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी विद्यानगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एका बुलेटसह एक दुचाकी असा एकूण एक लाख 20 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, पोलीस उप अधीक्षक अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे, सहाय्यक फौजदार संजय देवकुळे, पोलीस हवालदार शशी काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, आनंदा जाधव, सोनाली पिसाळ यांनी केली आहे.