
कराड : कोरोना कालावधीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास सांगितल्याच्या कारणावरून कोतवालांना शिवीगाळ, दमदाटी करीत मारहाण केल्याप्रकरणी एकाला तीन महिने कारावास व अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. कराड येथील जिल्हा व सत्र न्या. अण्णासाहेब पाटील यांनी ही शिक्षा ठोठावली.
फिरोज गणी मुजावर (रा. पाडळी-केसे, ता. कराड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाच्यावतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना कालावधीत २८ एप्रिल २०२० रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पाडळी गावातील ग्रामपंचायतीसमोर भाजीपाला विक्री सुरू होती. त्यावेळी भाजीपाला घेण्यासाठी लोकांची गर्दी झाल्यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत ग्रामपंचायतीकडून आवाहन करण्यात आले होते. गावचे कोतवाल सोशल डिस्टन्स पाळण्याबाबत ग्रामस्थांना आवाहन करीत असताना फिरोज मुजावर याने सोशल डिस्टन्स न पाळता विक्रेत्याजवळ जाऊन भाजी खरेदी केली. कोतवालांनी त्याला नियम पाळण्याबाबत सुनावल्यानंतर फिरोज मुजावर याने कोतवालांना शिवीगाळ, दमदाटी करीत धक्काबुक्की केली. तसेच मारहाण केल्यामुळे कोतवाल जखमी झाले.
याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक जिल्हा सरकारी वकील एस. व्ही. कुलकर्णी यांनी आठ साक्षीदार तपासले. फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आणि तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक बी. टी. पाटील यांच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या. सरकार पक्षाच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी फिरोज मुजावर याला गुन्ह्यात दोषी धरले. त्याला तीन महिने साधा कारावास, अडीच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास आणखी पंधरा दिवस साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली. हवालदार एस. बी. खिलारे, ए. के. मदने यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.