राज्यसातारासामाजिक

सातारा जिल्हा स्वच्छ व सुंदर करण्यासाठी स्वच्छता अभियान मिशन मोडवर राबवा ः शंभुराज देसाई

सातारा : गावठाणाच्या बाहेर, ग्रामीण मार्ग, इतर मार्ग, मुख्य जिल्हा मार्ग, राष्ट्रीय मार्गावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थापन काटेकोरपणे करण्यात यावे. कचरा अणि प्लास्टिक टाकून अस्वच्छता पसरविणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. पेट्रोलिंगसाठी पथके तयार करा. सर्व नगरपालिका, नगरपंचायती, ग्रामपंचायती यांनी स्वच्छ भारत मिशन मोहिम जिल्ह्यात मिशन मोडवर राबवावी. जिल्ह्यात कुठेही अस्वच्छता आढळल्यास यंत्रणांवर कठोर कारवाई करणार, असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.
स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा 2 ची आढावा बैठक पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, उपवनसंरक्षक आदिती भरद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, अपर पोलीस अधिक्षक आंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, प्रकल्प संचालक संतोष हराळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छता व पाणीपुरवठा क्रांती बोराटे, सर्व गटविकास अधिकारी आणि सर्व नगरपालिकांचे मुख्य अधिकारी, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा 2 मोहिमेचा आढावा घेवुन पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले जिल्ह्यात कोठेही अस्वच्छता आढळल्यास यंत्रणांची गय केली जाणार नाही. सातारा जिल्हा स्वच्छ आणि सुंदर दिसावा यासाठी येणाऱ्या आठ दिवसात या विषयामध्ये कायमस्वरुपी फरक दिसेल यासाठी काटेकोर नियोजन करा. अस्वच्छता पसरिवणाऱ्यांवर आणि बंदी असणाऱ्या प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. सर्व ग्रामपंचायतीमध्ये या विषयाच्या नियमनासाठी सीसीटीव्ही बसवा, व त्याआधारे कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करुन दंड वसूल करा.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी गावागावांमध्ये फिरती पथके तयार करा व ही पथके तयार करत असताना त्यामध्ये विद्यार्थ्यांचा समावेश करा. स्वच्छत मोहिमेसाठी आवश्यक साधन सामग्री तयार करा. घराच्या अंगणातील साफसफाई त्याच कुटुंबाने करावी यासाठी जनजागृती करा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी म्हणाले, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाअंतर्गत पाच हजार लोकसंख्येच्या आतील 1480 ग्रामपंचायतीमध्ये कामे सुरू आहेत. यातील 979 कामे पुर्ण झाली आहेत. सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापन यामध्ये जिल्हा परिषद अतिशय चांगले काम करीत आहे. भारत स्वच्छ मिशन अभियानाअंतर्गत गटविकास अधिकाऱ्यांनी संकलित केलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची दक्षता घ्यावी.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close