
कराड ः रेकॉर्डवरील गुन्हेगार व हजारमाची ता. कराड ग्रामपंचायतीचा सदस्य सोमनाथ सूर्यवंशी व त्याचे दोन साथीदार रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी सर्व रा.हजारमाची या तिघांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोम्या सूर्यवंशी व टोळीविरोधात खुन, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, गर्दी मारामारी, जुगार, अपहरण, सरकारी नोकरांवरील हल्ले व अवैध अग्निशस्त्र बाळगणे असे कराड शहर व पुणे येथे वैयक्तिक व टोळीने 13 गुन्हे दाखल आहेत.
पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक व त्यांच्या टीमकडून गुन्हेगारी विश्वाचा बिमोड करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. यामध्ये शहर व परिसरातील अनेक गुन्हेगार पोलीस विभागाचे हिटलिस्टवर आहेत. त्यापैकीच एक सोमा ऊर्फ सोमनाथ ऊर्फ आण्णा अधिकराव सुर्यवंशी (टोळी प्रमुख) व त्याचे दोन साथीदार रविराज ऊर्फ गुल्या शिवाजी पळसे व आर्यन चंद्रकांत सुर्यवंशी सर्व रा. हजारमाची ता. कराड यांच्याविरुध्द मोक्का (महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम 1999) अन्वये दाखल गुन्ह्यास अपर पोलीस महासंचालक यांची परवानगी प्राप्त झाल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे.
हजारमाची ता. कराड ग्रामपंचायत सदस्य व कराड शहर पोलीस ठाणे अभिलेखावरील गुन्हेगार सोमा ऊर्फ सोमनाथ सुर्यवंशी याच्या विरुध्द यापुर्वी कराड शहर व पुणे येथे वैयक्तिक व टोळीने असे असे एकुण मिळुन 13 गुन्हे यापुर्वी दाखल आहेत. पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर यांचेकडे मोक्का अंतर्गत कलमवाढीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिल्यानंतर त्या गुन्हयामध्ये मोक्का अंतर्गत कलमांचा समावेश करण्यात आला. पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनी गुन्हयाचा पुढील सखोल तपास करुन, आरोपींविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्याची पूर्व परवानगीसाठी अप्पर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) यांचेकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाला 10 जून रोजी मंजुरी प्राप्त झाली. त्यानंतर तिन्ही आरोपीविरुध्द बुधवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल यांनी मोक्का कारवाईच्या अनुषंगाने पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, स्थानिक गुन्हे शाखा सातारचे अरुण देवकर, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील व तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रदिप सुर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील तसेच पोलीस अंमलदार, असिफ जमादार, अनिकेत पवार, संजय देवकुळे, संतोष सपाटे, महेश लावंड, प्रशांत चव्हाण, प्रविण पवार, अमित सपकाळ, सागर बर्गे, दिपक कोळी, आनंदा जाधव, धीरज कोरडे, सोनाली पिसाळ यांचे अभिनंदन केले.