विधानसभेसाठी महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटप कसे होणार याबाबत हसन मुश्रीफ यांचा खुलासा

मुंबई : देशात 18 व्या लोकसभेसाठी नुकत्याच निवडणुका झाल्या. यामध्ये देशात एनडीएने पुन्हा एकदा सत्ता मिळवली. तर दुसरीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपच्या नेतृत्त्वाखालील महायुतीचा धुव्वा उडवला.
महायुतीला आलेल्या अपयशानंतर महायुतीमध्ये कुरबूर सुरू झाली, असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
अशात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनट मंत्री हसन मुश्रीफ यांना विधानसभेसाठी महाराष्ट्रात महायुतीमध्ये जागावाटप कसे होणार याबाबत खुलासा केला आहे.
कोल्हापूरचे पालकमंत्री असलेले हसन मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये तिन्ही पक्षांचे विद्यमान आमदार उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असतील. मुश्रीफ यांनी केलेल्या या विधानानंतर महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठारला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी स्पष्ट केले की, भाजप मोठा पक्ष असल्याने सहाजिकच त्यांना जास्त जागा मिळतील. पण आम्ही आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला त्यांचे विद्यामान आमदार असलेल्या जागा निश्चितच मिळणार आहेत. पण राहिलेल्या जागांवर निवडून येण्याची क्षमता लक्षात घेऊन जागावाटप होईल.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने महाराष्ट्र भाजपवर जोरदार टीका केली होती. यामध्ये त्यांना बहुमत असताना, अजित पवार यांना बरोबर घेतल्याने भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाल्याचे म्हटले होते.
तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही 400 पारचा नारा दिल्यामुळे जागा कमी झाल्याचे म्हटले होते. त्यामुळे महायुतीतील पक्ष पराभवाचे खापर एकमेकांवर फोडत असताना विधानसभेत हे तिन्ही पक्ष एकत्र लढणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर महाविकास आघाडीची आज पहिल्यांदा बैठक झाली. या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले की, महा विकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्रित लढवणार आहे.
महाविका आघाडी निवडणुकीच्या तयारीला लागली असताना महायुती विधानसभेची कशी तयारी करते हे पाहणे येत्या काळात औत्सुक्याचे ठरणार आहे.