विधानसभेत अजित पवारांची राष्ट्रवादी नको, भाजप आमदारांकडून आळवला जातोय सूर

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रात धक्का बसला. भाजपच्या आमदारांनी लोकसभेतल्या या पराभवाची चांगलीच धास्ती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजप आमदारांना सतावून लागली आहे. त्यामुळेचं विधानसभेत अजित पवारांची राष्ट्रवादी नको असा सूर भाजप आमदारांकडून आळवला जात आहे.
याशिवाय आरएसएस आणि भाजपच्या बैठकीतही महाराष्ट्रातल्या भाजपच्या पराभवाच्या प्रमुख कारणांपैकी अजित पवारांना सोबत घेणं असल्याचा सूर उमटला. आरएसएसचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायजरमधूनही अजित पवारांना सोबत घेण्यावरून भाजपवर निशाणा साधण्यात आला होता.
भाजप आणि आरएसएसकडून अजित पवारांना लक्ष्य केलं जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिक्रिया आली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
‘ऑर्गनायजर वृत्तपत्रामध्ये कुणीतरी एक लेख छापला, तेव्हापासून सातत्याने अजितदादांना टार्गेट करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात सुरू झाला. अंजली दमानिया असतील, अण्णा हजारेंच्या नावाने केलेली कुरघोडी असेल, सातत्याने बदनाम करण्याचा प्रकार होत आहे,’ असं म्हणत मिटकरींनी नाराजी व्यक्त केली.
‘आजही भाजपच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला, असं आमदार म्हणाले. राष्ट्रवादीमुळे महायुतीचा फायदा झाला, भाजपचाही फायदा झाला. पण अशाप्रकारे तुम्ही जाणीवपूर्वक अजितदादांना टार्गेट करणार असाल तर निश्चितच आम्हालासुद्धा वेगळा विचार करावा लागेल’, असा इशारा अमोल मिटकरींनी भाजपला दिला आहे.