क्राइमराज्यसातारा

कराडात तोतया पोलिसांकडून महिलेला गंडा

साडेपाच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास ः तोतया पोलिसांच्या शोधासाठी शहर गुन्हे प्रकटीकरणचे पथक रवाना

कराड ः शाहू चौक येथील शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर पोलीस असल्याची बतावणी करीत महिलेचे साडेपाच लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन दोघांनी पोबारा केला. ही घटना शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबतची फिर्याद श्रीमती मंगल शशिकांत बेंद्रे (वय 63 रा. मुळीक गल्ली, शनिवार पेठ, कराड) यांनी शहर पोलिसात दिली असून याप्रकरणी तोतया पोलिसांवर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तोतया पोलिसांच्या शोधासाठी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक रवाना झाले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मंगल बेंद्रे ह्या नेहमीप्रमाणे गणपती मंदिर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. तेथे देवदर्शन करून त्या नामस्करण करत चालत चालत दैत्यनिवारणी मंदिराकडे जात होत्या. शाहू चौक येथील पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर आल्या असता 35 ते 40 वर्ष वयोगटातील एकाने मंगल बेंद्रे यांना हाक मारली. तेव्हा बेंद्रे यांनी त्यास काय असे विचारले असता त्याने रस्त्याचे पलीकडे उभे राहिलेल्या इसमाकडे बोट दाखवून ते साहेब काय म्हणतात ते ऐका असे सांगितले. त्यानंतर बेंद्रे ह्या रस्त्याचे पलीकडे उभा असलेल्या इसमाकडे गेल्या तेव्हा त्याने मी कराड शहर पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी शिंदे आहे, असे बोलून त्याने बेंद्रे यांना त्याचे आयडेंटी कार्ड दाखविले. त्यानंतर तोतया पोलिसाने सांगितले की, काल येथे सविता नावचे महिलेचा सोन्याच्या दागिन्यासाठी खून झाला आहे. आणि तुम्ही इतके सोन्याचे दागिने घालून कशाला फिरता, सोन्याचे दागिने काढून ठेवा, असे म्हणून त्याने त्याचे खिशातील रूमाल काढून त्यामध्ये दागिने काढून ठेवण्यास सांगितले. त्यावेळी बेंद्रे यांनी त्यांच्याकडील एक लाख 90 हजार रूपये किमतीच्या सोन्याचे पैलू पाटल्या, 2 लाख 44 हजार रूपये किमतीच्या सोन्या बांगड्या, 85 हजार रूपये किमतीचे सोन्याचे मिनीगंठण, 20 हजार रूपये किमतीची सोन्याची चैन असा एकूण 5 लाख 39 हजार रूपये किमतीचे दागिने काढून तोतया पोलिसाने ते रूमालात ठेवून रूमालाची गाठ मारून तो पिशवीत बांधला. व ती पिशवी घेऊन तुम्ही घरी जावा असे सांगितले. त्यानंतर दैत्यनिवारणी येथे बेंद्रे गेल्या असता त्यांनी पिशवीमध्ये पाहिले असता त्यांचे दागिने नव्हते. त्यानंतर बेंद्रे यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी कराड शहर पोलिसात फिर्याद दिली. यावरून तोतया पोलिसावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close