
रत्नागिरी ः कोकणात जेवढं काम करता येईल तेवढे केले पाहिजे होते. कारण कोकणाने नेहमीच बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केले आहे. आमच्या सगळ्यांवर प्रेम केले आहे. फक्त राजकारणासाठी कोकणी माणसाला वापरून घेण्याचे काम आम्ही करणार नाही, कधीही आमचे सरकार करणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरीत सुरू झालेल्या कोका-कोला कंपनीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन केले. याप्रसंगी ते बोलत होते. तसेच कोका-कोला कंपनीची 2015 मध्ये येथे येण्याची इच्छा होती, असे शिंदे म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अमेरिका दौऱ्याचाही उल्लेख केला. तर भाषणात शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीकाही केली.
पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोका-कोला कंपनीचे देशभरात आज हजारो कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीने 2023 मध्ये भारतात एकूण 12 हजार 840 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कोका-कोलासारखी कंपनी रत्नागिरीत उभी राहत आहे. त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होईल. सरकारची स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका आहे. व्यवस्थापनानेही या कंपनीत स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे, असे शिंदे म्हणाले.
‘कोकणात सरकारने ठरवल्याप्रमाणे सगळी कामे केली आहेत. कारण आम्ही दिलेला शब्द पाळतो. मी आजपर्यंत भरपूर कागदांवर सह्या केल्यात. गुवाहाटीवरुन फोन करुन मी अनेक कामे केली आहेत, कारण सगळे प्रकल्प व्हायला हवेत ही एकच इच्छा होती, असेही शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.