अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून माझ्या जीवितस धोका : सुदर्शन चौधरी

मुंबई : लोकसभा निवडणूक निकालाच्या आढावा बैठकीत भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने महायुतीत वादंग निर्माण झालं आहे.
अजित पवारांना युतीतून बाहेर काढलं पाहिजे, अशी भावना सुदर्शन चौधरी यांनी व्यक्त केली. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी चौधरी यांच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केलं. यावेळी राष्ट्रवादीचे काही कार्यकर्ते शाईफेक करण्याच्या तयारीतही आले होते. या पार्श्वभूमीवर सुदर्शन चौधरी यांनी भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे संरक्षणाची मागणी केली आहे.
“मी जनभावना व्यक्त केली म्हणून पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ॲाफिसमध्ये राष्ट्रवादीचे गुंड येऊन घोषणाबाजी करत आहेत. माझ्या जीवितास धोका निर्माण झाला असून देवेंद्रजी मला संरक्षण द्यावे ही विनंती,” अशी पोस्ट एक्सवर सुदर्शन चौधरी यांनी लिहिली आहे. लोकसभा निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमध्ये राष्ट्रवादीविरोधात सूर उमटल्यानंतर आता भाजप कार्यकर्तेही आपली खदखद बोलून दाखवत असल्याने महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.
शिरूर लोकसभा मतदारसंघाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला आमदार राहुल कुल यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत सर्वांसमोर भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.
“अजित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर अन्याय केला. त्यामुळे कार्यकर्त्यांचं मन जाणून घेत निर्णय घेणार असाल तर अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा. अजित पवारांनी राहुल कुल, सुभाष बाप्पू, योगेश दादा या तिघांवर अन्याय केला. हे तिघेही मंत्री झाले असते. अनेकांना महामंडळ मिळाले असते. अजितदादा असतील तर ही सत्ता आणि ही खुर्ची नको. ज्या राष्ट्रवादीचा आम्ही दहा वर्षापासून विरोध करतोय तीच राष्ट्रवादी आता सोबत घेतली आहे. विधानसभेला अजितदादा सोबत असतील आणि सत्ता मिळणार असेल तर ती सत्ता आपल्याला नकोय अशी भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अजितदादांसाठी सत्ता आणायची का?” असे म्हणत भाजपच्या बैठकीत या पदाधिकाऱ्याने आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली.