
कराड ः विद्यानगर ता. कराड येथील सुर्या कॅफेवर कराड शहर पोलिसांनी पोक्सो कायद्या अंतर्गत कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी अल्पवयीन मुलीबरोबर अश्लिल कृत्य करणारा व संशयित आरोपीला मदत करणारा कॅफे मालक या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांना शनिवारी न्यायालयात हजर केले असता बुधवार दि. 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जय संतोष पाटील (वय 21, रा. वडगाव हवेली, ता. कराड), व कॅफेचालक अभिषेक सिध्दप्पा अंकलगी (वय 33, रा. मलकापूर, ता. कराड) अशी पोलीस कोठडी मिळालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड शहर पोलीस ठाणे हद्दीतील विद्यानगर, सैदापूर, बनवडी परिसरातील कॅफे हे नियमानुसार चालतात का? या संदर्भात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सांडगे, कांबळे, शेडगे यांनी शुक्रवारी सकाळी विद्यानगर येथील सुर्या कॅफेवर कारवाई केली. यावेळी जय पाटील हा कॅफेच्या दुसऱ्या मजल्यावर पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहित असताना तिच्यासोबत अश्लिल कृत्य करताना मिळून आला. तसेच सदरचे कृत्य करणेसाठी कॅफे मालक अभिषेक अंकलगी याने मदत करत असल्याचे दिसून आल्याने पोलिसांनी दोघांवर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली. शनिवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता बुधवार दि. 3 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रत्नदिप भंडारे करीत आहेत.
सदरची कारवाई डीवायएसपी अमोल ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार कांबळे, सांडगे, शेडगे यांनी केली.