महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं
20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला निकाल

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार पकरिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर केला.
महाराष्ट्रात 26 नोव्हेंबरआधी नवं सरकार बनणार आहे. त्याआधी निवडणूक घ्यावी लागेल, असं राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला सांगितलं. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 186 मतदार केंद्र राहतील. या मध्ये 57 हजार 601 ग्रामीण पोलिंग स्टेशन आणि 42 हजार 582 शहरी पोलिंग स्टेशन राहतील, असं राजीव कुमार यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात ९ कोटी ६३ लाख मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या ही ४ कोटी ९३ लाख इतकी आहे. तर महिला मतदारांची संख्या ४ कोटी ६६ लाख इतकी आहे. तसेच तरुण मतदारांची १ कोटी ८५ हजार तरुण मतदार आहेत. तर महाराष्ट्रात २० लाख ९३ हजार तरुण पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. तसेच दिव्यांग मतदारांची 6 लाख 2 हजार इतकी संख्या आहेत. तर १२ लाख ५ हजार संख्या ही ज्येष्ठ नागरिकांची आहे. विशेष म्हणजे 85 वर्ष वरच्या मतदारांना घरातून मतदान करता येणार आहे. तसेच मोठीं रांग असेल तर रांगेच्या मध्ये खुर्च्यांची व्यवस्था केली जाणार आहे, अशी माहिती निवडूण आयुक्तांनी दिली. सर्व पोलिंग स्टेशन 2 किमीच्या आत असावेत, असे निर्देश निवडणूक आयुक्तांनी दिले आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक ही एकाच फेजमध्ये होणार आहे. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडणार आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी केली जाईल, अशी महत्वाची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची तारीख ही 22 ऑक्टोबरपासून सुरु होईल. उमेदवार 29 ऑक्टोबरपर्यंत आपला अर्ज दाखल करु शकणार आहेत. यानंतर 30 ऑक्टोबरला सर्व उमेदवारांच्या अर्जाची छाननी होईल. तर 4 नोव्हेंबर 2024 ला पर्यंत उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊ शकणार आहेत, अशी माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगूल आज अखेर वाजलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या निवडणुकीची चर्चा सुरू आहे. ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी जास्त महत्त्वाची आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये ज्या राजकीय घडामोडी घडल्या त्या घडामोडींवर जनतेच्या मनात नक्की आहे ते जाणून घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आणि तिचे निकाल हे इतिहासाच्या पानांवर ठळकपणाने नोंद होणार आहेत. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये जे घडलं ते अनेक दशकांपासून घडलं नव्हतं. महाराष्ट्राला एक चांगली राजकीय संस्कृती आहे असं सुरूवातीपासून मानलं जात आहे. असं असलं तरी या राजकीय संस्कृतीला आता खरंच गालबोट लागलं आहे का, राजकारणात घडलेल्या घडामोडींवर लोकांचा रोष आहे का? ते आता निवडणुकीतून समोर येणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून विधानसभा निवडणूक जाहीर कधी होईल? याकडे सर्वांचं लक्ष होतं. जम्मू-काश्मीर आणि हरियात निवडणुका पार पडल्या तेव्हा महाराष्ट्रातही निवडणूक घेतली जाईल, अशी आश होती. पण निवडणूक आयोगावर कामाचा ताण येईल, अपुरे मनुष्यबळ अशा काही कारणास्तव महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान, दोन्ही राज्यांच्या निवडणुकांनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तांसह इतर आयुक्त महाराष्ट्रात आले होते. या अधिकाऱ्यांनी निवडणूक तयारीसाठी सर्व्हे केला होता. तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांसोबत बैठका देखील घेतल्या होत्या. निवडणूक अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर राज्यात विधानसभेचं बिगूल लवकर लागणार याचे संकेत आधीच मिळाले होते. अखेर निवडणूक जाहीर झाली आहे.