
कराड : मराठा आरक्षणाचा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आहे. मराठा आरक्षण प्रश्नी देवेंद्र फडणवीस यांनी धूळफेक केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन केल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण कोर्टात का टिकलं नाही, यावर मत व्यक्त केले.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण मिळायला हवे. हा प्रश्न देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आणि महाराष्ट्राची निमिर्ती झाल्यानंतर पहिल्यांदा मी हाताळला होता. त्यावेळी आमचे सरकार असताना मंत्रिमंडळाची उपसमिती नेमली आणि त्या समितीने वर्षभर अभ्यास करुन अहवाल दिला. मी तसेच अजित पवार, छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात हे सगळे मंत्री असताना निर्णय घेतला. मराठा समाजाला क्रिमिलेअरची अट टाकून 16 टक्के आरक्षण द्यावे. त्याबरोबर मुस्लिम धर्मातील मागासलेल्या 50 जातींना 5 आरक्षण दिले होते. जुलै 2014 मध्ये हे आरक्षण दिले होते. सरकार टिकलं नाही तर आरक्षण टिकणार नाही. सरकार पडल्यामुळे आम्हाला यश मिळालं नाही. त्यानंतर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी कोर्टात आरक्षण टिकवायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. तो त्यांनी केला नाही. तो अध्याय तिथेच संपला.
देवेंद्र फडणवीस यांनी 2018 मध्ये अशाचप्रकारे कायदा केला. त्यांनी 16 टक्क्यांऐवजी 12 टक्के आरक्षण दिले. ही चक्क फसवणूक होती. नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये याबाबत विधिमंडळात आरक्षण कायद्याला मंजुरी दिली. पण त्याआधी जुलै- ऑगस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 102वी घटनादुरुस्ती करुन राज्यांचे सर्व मागासवर्ग ठरविण्याचे अधिकार काढून घेतले होते. फडणवीस यांना आरक्षण देण्याचा अधिकाराच नव्हता. त्यामुळे त्यांनी नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये जो कायदा केला ती केवळ धूळफेक होती, असा आरोप त्यांनी केला आहे.