लोकशाही आहे, मनोज जरांगे पाटलांना उपोषणास बसण्याचा अधिकार आहे : छगन भुजबळ

पुणे : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षण देखील दिलं. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अजूनही जरांगे पाटील ठाम आहेत.
त्यांनी आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला 13 जुलैपर्यंतचा वेळ दिला होता. मात्र ही डेडलाई शनिवारी संपली. त्यानंतर आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. येत्या 20 तारखेपासून आपण अमरण उपोषण करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही सरकारला मराठा आरक्षणासाठी 13 जुलै पर्यंतचा वेळ दिला होता. मात्र आता वेळ संपली आहे. आजपासून आमची रणनिती सुरू झाली. येत्या वीस जुलैपासून मी पुन्हा उपोषणाला बसणार आहे. वीस जुलैलाच ठरवू मराठा समाजाची बैठक कधी बोलावायची ते असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ यांनी सावध भूमिका घेतली आहे. ‘जरांगे उपोषणाला बसत आहेत, लोकशाही आहे, त्यांना अधिकार आहे’ असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान यावेळी बोलताना भुजबळ यांनी विविध विषयांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अधिवेशन संपलं आहे. या अधिवेशनात अनेक विषयांना मंजुरी मिळाली. लाडकी बहिण योजना, शेतकरी वीज बिल, विद्यार्थी योजना, शेतकरी सन्मान योजना या योजना धाडसाच्या आहेत, या योजना मंजूर केल्या. अजून अनेक निविदा निघाल्या आहेत, असं भुजबळ यांनी म्हटलं आहे.