बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला

जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभारलं. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारनं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं.
मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण देण्यात यावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील अद्यापही ठाम आहेत. तर दुसरीकडे ओबीसी समाजाचा मनोज जरांगे पाटील यांच्या या मागणीला जोरदार विरोध होत आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती, मात्र सरकारच्या आश्वासनानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेतलं. ओबीसी आरक्षणला धक्का लागणार नाही असं सरकारनं लेखी द्यावं ही लक्ष्मण हाके यांची प्रमुख मागणी होती.
या सर्व घडामोडींनंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुन्हा एकदा अतंरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवण्यासाठी राजेंद्र राऊत यांनीच मध्यस्थी केली होती. राजेंद्र राऊत हे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी राजेंद्र राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आज राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे.
आमदार राजेंद्र राऊत आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये अंतरवाली सराटीत जवळपास एक तासांपेक्षा अधिक चर्चा झाली. 20 जुलै रोजी मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे, या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाकडे आता सर्वाचं लक्ष लागलं आहे.