ताज्या बातम्याराजकियराज्य

महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतल्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलंय : देवेंद्र फडणवीस

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत मतरुपी आशीर्वाद न दिल्यास, लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यातून काढून घेईन, असं विधान आमदार रवी राणा यांनी सोमवारी अमरावतीत एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं.

या विधानावरून विरोधकांकडून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जाते आहे. दरम्यान, यावरून आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आमदार राणा यांचं नाव न घेता त्यांना सुनावलं आहे. जळगावात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

“लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे. कुणी म्हणतंय की महिलांना विकत घेता का? कुणी म्हणतंय महिलांना लाच देत का? पण विरोधकांना बहिणीचं प्रेम समजणार नाही. बहिणीच्या प्रेमाचं मोल त्यांना समजणार नाही. १५०० रुपयांत बहिणींचं प्रेम विकत घेता येत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“आम्ही महिलांना १५०० रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ही बहिणींना दिलेली भाऊबीज आहे. ते प्रेम आहे. बहिणींच्या संसाराला आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने आम्ही लाडकी बहीण ही योजना सुरु केली आहे. आज विरोधक विचारत आहेत, की १५०० रुपयांत काय होतं? मात्र, ज्यावेळी त्यांना संधी होती, तेव्हा त्यांनी फुटकी कवडीही महिलांना दिली नाही. आता आम्ही १५०० रुपये देतो आहोत, तर त्यांच्या पोटात दुखायला लागलं आहे. त्यामुळे महिलांना या सावत्र भावांपासून सावध राहावं लागेल”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, यावेळी लाडकी बहीण योजनेबाबत केलेल्या विधानावरून त्यांनी आमदार रवी राणा यांनाही नाव न घेता सुनावलं. यासंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचे काही मित्र गंमती गंमतीत बोलताना काहीही बोलतात. कुणीतरी म्हणतं पैसे परत घेऊ, पण वेड्यांनो या देशात भाऊबीज कधीच परत घेतली जात नाही. एकदा भाऊबीज दिली, की त्याच्या बदल्यात केवळ प्रेम मिळते. त्यामुळे कुणी मत दिलं किंवा नाही दिलं, तरी ही योजना बंद केली जाणार नाही. कुणाचा बाप ही योजना बंद करू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close