महाविकासआघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आणि गोपीचंद पडळकरना जेलमध्ये जावं लागेल : आमदार नितेश राणे

विटा : महाविकासआघाडीचं सरकार आलं तर आपल्याला आणि गोपीचंद पडळकरना जेलमध्ये जावं लागेल, असं वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं आहे. सांगलीच्या विटामध्ये झालेल्या सभेत नितेश राणे बोलत होते.
ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणुकीत चुकून महाविकासआघाडीचं सरकार आल्यास आम्हा लोकांना कुठे बघाल, याचा विचार करून टाका, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
मी आणि गोपीचंद पडळकर दोघंही सहा महिन्यात कोल्हापूरच्या मुख्य जेलमध्ये भेटू आणि आपसात गोट्या खेळत असू. आम्हाला तर हे लोक बाहेर ठेवणार नाहीत. मला तर पहिल्या 100 दिवसांमध्ये आत टाकतील, मला तर माहिती आहे, त्यामुळे मी बॅग भरून ठेवली आहे, अशी टोलेबाजी नितेश राणे यांनी केली आहे.
तुम्ही निर्धार केला आहे, आपलं सरकार जाऊ द्यायचं नाही. महाराष्ट्र पिंजून काढायचा, भाजपचं आणि आपल्या महायुतीचं सरकार आणून दाखवायचं, असा निर्धार केला आहे. आता राजकारण राहिलेलं नाही, गँगवॉर सुरू झाला आहे. एक दुसऱ्याला मारून टाकण्यापर्यंत विषय जातात, असं नितेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान राजकोट किल्ल्यावरच्या शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्यावरून महायुतीतल्या नितेश राणे आणि अमोल मिटकरी यांच्यात चांगलीच जुंपली आहे. अमोल मिटकरीचा धर्म तपासण्याची वेळ आली आहे, अमोल मिटकरी हिंदू धर्मात राहायच्या लायकीचा राहिला नाही, अशी टीका नितेश राणेंनी केली.
नितेश राणेंनी केलेल्या या टीकेवर अमोल मिटकरींनीही पलटवार केला आहे. त्यांना नेपाळला पाठवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता उत्सुक असल्याचा टोला मिटकरींनी लगावला आहे. नितेश राणेंची लायकी काय आहे हे पोलिसांना माहिती आहे. पोलिसांच्याबाबत अश्लिल बोलणारा व्यक्ती बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हिंदूच आहे, यावर राणेंनी थोबाड का उघडलं नाही? अशी टीका अमोल मिटकरींनी केली आहे.
‘आता तो मला हिंदू धर्म शिकवतोय. माझी त्या राणेंच्या पूत्राला विनंती आहे, त्याने हिंदू धर्मातील चार वेद, सहा शास्त्र आणि 18 पुराणं आहेत त्याची नावं सांगावी आणि आपलं हिंदुत्व सिद्ध करावं’, असं आव्हान मिटकरींनी दिलं आहे. आम्हाला पाकिस्तानात पाठवण्याची भाषा त्यांनी करू नये, त्यांनाच आपण नेपाळमध्ये पाठवण्याची व्यवस्था राष्ट्रवादी काँग्रेसकडून केली असल्याचा टोला मिटकरींनी नितेश राणेंना लगावला आहे.