
कराड : कराड तहसील कार्यालयातील सेतू मध्ये अनागोंदी कारभार सुरू असून याबाबत अनेक वेळा आवाज उठवण्यात आला आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांकडून दाखल्यांच्या पावतीच्या नावे ज्यादा रक्कम लाटून ठेकेदार सुस्तावले आहेत. या ठेकेदारांची वरिष्ठ पर्यंत सेटिंग असल्याने त्यांना कुणाचीही भीती राहिली नाही. यामध्ये दररोज हजारो रुपयांचा भ्रष्टाचार होत असून याकडे अधिकारी गांभीर्याने घेत नाहीत. या सेतू ठेकेदारांना तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने हे सेतू ठेकेदार निर्ढावलेले आहेत.
मागील आठवड्यामध्ये अप्पर जिल्हाधिकारी हे कराडमध्ये शांतता कमिटीच्या मीटिंगसाठी आले असता त्यांनी प्रथम प्रशासकीय इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयास भेट दिली. त्यावेळेस अप्पर जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार हे त्या ठिकाणी सर्वजण असताना काही तक्रारदार यांनी सेतू कार्यालयामध्ये दिल्या जाणाऱ्या पावतीच्या पाठीमागे लोकसभेच्या उमेदवारांची नावे असलेले फॉर्म नंबर 17c पार्ट टू या कागदपत्रावरती पावती देत आहेत याबाबतचे त्यांना सर्व पुरावे व कागदपत्रे निदर्शनास आणून दिली. तसेच निवडणूक शाखेतून महत्वाची असलेली कागदपत्रे सेतू कार्यालयामध्ये येतातच कशी याबाबत विचारले असता अप्पर जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना ही बाब गंभीर असून त्या सेतूच्या ठेकेदारास तात्काळ नोटीस काढण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या होत्या. परंतु या घटनेला आठ दिवस झाले तरी कोणतीही कारवाई अथवा त्या सेतूचा ठेकेदारास नोटीस देण्यात आलेली नसल्याने या सर्व गौडबंगाल मागे नक्की कोणाचा हात आहे याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. वरिष्ठ अधिकारी यांनी दिलेल्या सूचनांना कराड तहसीलदार कार्यालयातून केराची टोपली दाखवण्यात आली आहे, याबाबत वरिष्ठ काय निर्णय घेणार का हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
काही तक्रारदारांनी तहसील कार्यालयामध्ये अर्ज टाकून सेतू कार्यालयामध्ये शासकीय नियमाने नेमके किती पैसे प्रतिज्ञापत्रासाठी व इतर दाखल्यासाठी घेतले जावे याबाबत विचारणा केलेली आहे. परंतु तहसील कार्यालयातील निवासी नायब तहसीलदार हे तक्रारदारांना उद्धट भाषेत उत्तरे देत असल्याचे पहावयास मिळत आहे. तुम्ही अर्ज दिलेला आहे त्यामुळे आम्ही सेतू कार्यालयाकडून त्याची माहिती घेऊन तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर कळवले जाईल. आम्हाला बाकीचेही कामे आहेत. जर का तो जास्त पैसे घेत असेल तर शासन त्याच्याकडून ज्यादा घेतलेली रक्कम वसूल करेल अशी शासकीय उत्तरे देत आहेत. यावरून निवासी नायब तहसीलदार जनतेला लुटणाऱ्या सेतू ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे दिसून येत आहे.
सेतू ठेकेदाराकडून निवासी नायब तहसीलदार यांना काही आश्वासने दिली असल्याचे त्यांच्या एकंदरीत वागण्यातून दिसून येत आहे. त्यामुळे निवासी नायब तहसीलदार यांना तक्रारदार हे त्यांच्या रानातील हजेरीवर कामाला आलेले मजुरा सारखे वाटत असल्यासारखे उत्तरे देत आहेत. काही ठराविक महा ई सेवा केंद्र चालकांना निवासी नायब तहसीलदार यांच्याकडून त्यांना त्यांच्या कामाबाबत ज्या पद्धतीने हजर जबाबी पणा दाखवतात त्याच पद्धतीने इतर कामातही हा हजर जबाबी पणा दाखवावा अशी जनतेतून अपेक्षा होत आहे.
क्रमशः