
कराड : सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महसूल कराड तालुक्यातून जमा होतो. कराड तालुक्यामध्ये क्रेशर व्यवसाय, दगडखानी, मुरूम व्यवसाय हा मोठ्या प्रमाणात केला जातो. हा सर्व व्यवसाय अधिकारी यांच्या आशीर्वादाने कराड तालुक्यात जोमाने सुरू आहे. जे प्रामाणिक व्यवसाय करणारे आहेत त्यांच्यासाठी अनेक अटी व निर्बंध घातलेले आहेत. मात्र, ज्यांची मंथली वेळेवर कार्यालयात पोहोचते अशा लोकांना या अटी व शर्तीतून सुटका देण्यात आली आहे. त्यामुळे प्रामाणिक व्यवसाय करणारे उपाशी आणि गौण खनिज अधिकारी तुपाशी अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
कराड तालुक्यात डोंगरभागांच्या ठिकाणी अनेक जनांना महसुली अधिकाऱ्यांनी उत्खनन करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यांच्याकडून वेळेवर आर्थिक लाभ होत असल्याने त्यांना पाठीशी घालण्याचे काम अधिकाऱ्यांकडून केले जात आहे. कराड तहसील कार्यालयात सध्या गौण खनिज उत्खनन करण्यासाठी अनेक व्यावसायिकांचे पंधरा ते वीस दिवस झाले अर्ज आलेले आहेत. तसेच त्यांच्या अर्जावरती सर्कल चौकशीही होऊन आलेली आहे. परंतु त्या अर्जामध्ये प्रत्येक वेळी काही ना काही कारणे सांगून नागरिकांना वेटीस धरले जाते व त्यांना जाणून बुजून त्रास दिला जातो. या व्यवसायिकांना व्यवसाय करायचा असल्याने त्यांना ऐकून घ्यावे लागते अन्यथा परवानगी मिळण्याचे त्यांनी विसरून जायचे अशी अवस्था सध्या गौण खनिज विभागामध्ये सुरू आहे.
आपण सूर्य प्रकाश असल्यानंतर नागपंचमीला नागराजाला दूध पाजतो व त्याची पूजा करतो परंतु त्याचा आपण संभाळ करू शकत नाही. तसेच आपण नागराजांच्या डोक्यावरती दहाचा आकडा पाहिलेला आहे. परंतु सध्या पाचचा आकडा खूप चर्चेत आहे. त्यामुळे लोकांची अशी अवस्था गौण खनिज बाबत झालेली आहे की धरले तर चावतय सोडलं तर पळतय.
ज्या पद्धतीने एखाद्याला एखादा अंक नशीबवान वाटतो याच पद्धतीने सध्या या पाचच्या आकड्या बाबत तहसील कार्यालयामध्ये जोरदार चर्चा चालू आहे. जोपर्यंत याची चर्चा होत नाही तोपर्यंत तुमच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी निघत राहतात व तुम्हाला हेलपाटे मारावे लागतात. परंतु याबाबत ज्यांना माहित आहे त्यांचे काम लवकर झाले म्हणून समजा.
तसेच गौण खनिज विभागाबाबत जो भांडत असतो त्याला चहा पाजला जातो व जो प्रामाणिक व्यवसाय करतो त्याला हेलपाटे मारावे लागतात. सध्या मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयातून जर परवानगी आदेश दिलेले नाहीत तर जे गौण खनिज उत्खनन चालू आहे ते कुणाच्या आशीर्वादाने चालू आहे. परंतु यामध्ये प्रामाणिक व्यवसाय धारक भरडला जात आहे. याबाबत वरिष्ठ अधिकारी लक्ष घालून कारवाया करणार का? याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
क्रमशः