
कराड ः सातारा तसेच सांगली जिल्हयातील वाळवा, शिराळा व कडेगाव तालुक्यातुन हद्दपार केलेल्या रेकॉर्डवरील गुंडास डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्या पथकाने ओगलेवाडी येथून ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध कराड शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी सुरेश शिंदे (वय 25, रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या रेकॉर्डवरील गुंडाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा जिल्हयामध्ये गुन्हेगार व त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सक्त सुचना केल्या आहेत.
कराडचे पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की पोलीस अभिलेखावरील व सध्या हददपार असलेला कुख्यात संशयित सनी सुरेश शिंदे रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा हा ओगलेवाडी, कराड परिसरात तडीपार असतानाही वावरत आहे. त्याचे खात्री करून पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांच्या पथकाने ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा येथे सापळा रचून संशयित सनी शिंदे ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेला सनी शिंदे हा कराड तालुक्यातील ओगलेवाडी गावचा रहिवासी आहे. तो पोलीस अभिलेखावरील कुख्यात गुंड असुन, तो अमित कदम त्याच्या टोळीचा सदस्य आहे. या टोळीवर कराड शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, बेकायदेशीर अग्निशस्त्राचे व अवैध दारु विक्रीचे व्यक्तीगत व टोळीने गुन्हे दाखल आहेत. सदर टोळीचा प्रमुख अमित हणमंत कदम (वय 27, रा. होली फॅमिलीचे मागे, वैभव कॉलनी विद्यानगर सैदापुर कराड) हा असून टोळीचे सदस्य सनी सुरेश शिंदे (वय 25 वर्षे रा. ओगलेवाडी ता. कराड जि. सातारा), वाहिद बाबासो मुल्ला (वय 26 वर्षे रा.विंग ता. कराड जि. सातारा), रिजवान रज्जाक नदाफ (वय 24 वर्षे रा. मलकापुर ता. कराड) हे आहेत. पोलीस अधीक्षक सातारा यांचेकडील हददपार आदेशाने 1 ऑगस्ट 2024 रोजी संपूर्ण सातारा तसेच सांगली जिल्हयातील वाळवा, शिराळा व कडेगाव तालुक्यातुन संशयित सनी शिंदे याला 2 वर्षाकरीता पोलिसांनी तडीपार केले होते. मात्र तरीही आदेशाचे उल्लंघन करून तो ओगलेवाडी परिसरात वावरत होता, त्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकुर, सहा. पोलीस निरीक्षक अमित बाबर, पोलीस अंमलदार प्रविण पवार, सागर बर्गे, दिपक कोळी यांनी केली.